पंजाब नॅशनल बँकेनं खास प्रकारचं वेअरेबल डेबिट कार्ड सादर केलं आहे. सध्या ते तीन डिझाईन्समध्ये उपलब्ध आहे. हे डिझाईन्स पीव्हीसी कीचेन, लेदर कीचेन आणि मोबाइल स्टिकर्सच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. हे बॅक-एंड वर डेबिट कार्ड असेल. हे कार्ड तुमच्या PNB बँक खात्याशी थेट लिंक केलं जाईल. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, केवायसी नुसार बँक खातं असलेली किंवा डेबिट कार्ड जारी करण्यास पात्र असलेली कोणतीही व्यक्ती या डेबिट कार्डसाठी अर्ज करू शकते. या कार्ड्सची वैधता ७ वर्षांसाठी असेल.
किती असेल लिमिट?
पीएनबीनं दिलेल्या माहितीनुसार, एटीएममधून दररोज पैसे काढण्याची मर्यादा या कार्डवर लागू नाही. परंतु, दैनंदिन व्यवहाराची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे कार्ड फक्त डोमेस्टिक वापरासाठी जारी करण्यात येतं हेदेखील लक्षात ठेवलं पाहिजे. या कार्डद्वारे तुम्ही दररोज जास्तीत जास्त ६० हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकता. ही मर्यादा POS मशीन आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या दोन्हीसाठी आहे. एक गोष्ट देखील लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे POS वर फक्त कॉन्टॅक्टलेस व्यवहार केले जाऊ शकतात. मात्र इतर डेबिट कार्डांप्रमाणे या कार्डवर लाउंजची सुविधा उपलब्ध होणार नाही.
किती असेल शुल्क?
जर तुम्ही लेदर कीचेन डेबिट कार्ड निवडलं तर तुम्हाला त्यासाठी ४५० रुपये अधिक अधिक टॅक्स असं शुल्क भरावं लागेल. जर एखाद्याला पीव्हीसी की चेन डेबिट कार्ड घ्यायचे असेल तर त्याला ४०० रुपये अधिक टॅक्स असं शुल्क आणि जर एखाद्यानं मोबाइल स्टिकर डिझाइनसह डेबिट कार्ड निवडलं तर त्याला ४५० रुपये अधिक टॅक्स असं शुल्क भरावं लागेल. आणखी एक गोष्ट, या तीनपैकी कोणत्याही डेबिट कार्डसाठी, तुम्हाला अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज म्हणून १५० रुपये अधिक टॅक्स भरावा लागेल. परंतु ही कार्ड्स रिप्लेस करण्यासाठी तुम्हाला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही. प्रत्येक बँक खात्यासाठी जास्तीत जास्त दोन वेअरेबल डेबिट कार्ड जारी केले जाऊ शकतात.