केंद्र सरकारनं दोन महिन्यांनंतर पुन्हा देशांतर्गत पेट्रोलियम क्रूडवर विंडफॉल टॅक्स लागू केला आहे. कच्च्या पेट्रोलियमवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क (SAED) शून्यावरून १६०० रुपये प्रति मेट्रिक टन करण्यात आलं आहे. हे शुल्क 15 जुलैपासून लागू करण्यात आलं आहे. मे महिन्यात सरकारनं क्रूड पेट्रोलियमवरील विंडफॉल टॅक्स ४१०० रुपये प्रति टन वरून शून्यावर आणला होता.
अर्थ मंत्रालयानं यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. पेट्रोलियम क्रूडवर विंडफॉल टॅक्स आणि स्पेशल अॅडिशनल एक्साईज ड्युटी १५ जुलैपासून लागू केली जात असल्याचं यात म्हटलंय. सरकारनं डिझेल, पेट्रोल आणि एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील विंडफॉल टॅक्स शून्य ठेवला असल्याचं म्हटलंय. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे हा बदल झाला आहे. दोन आठवड्यांतील सरासरी तेलाच्या किमतींवर आधारित दर पंधरवड्याला टॅक्स रेट रिव्ह्यू केले जातात. विंडफॉल प्रॉफिट टॅक्सची गणना इंधन कंपन्यांना एका मर्यादेच्या वर मिळणाऱ्या कोणत्याही किमतीला काढून केली जाते.
गेल्या वर्षी, जुलै २०२२ मध्ये प्रथमच, सरकारनं क्रूड ऑईल प्रोड्युसर्सवर विंडफॉल कर लादला आणि पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाच्या (ATF) निर्यातीवर शुल्क वाढवलं. यासह भारत त्या देशांच्या यादीत समाविष्ट झालाय जे ऊर्जा कंपन्यांच्या अतिरिक्त नफ्यावर किंवा विंडफॉल प्रॉफिटवर कर आकारतात.