Rice Price Today: आगामी काळात तांदळाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात कमी उत्पन्नाचा अंदाज आणि गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत ११ टक्क्यांची वाढ लक्षात घेता ही दरवाढ पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. अन्न मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली.
निर्यात धोरणात बदलमंत्रालयाने दिलेल्या माहितीत, भारताच्या तांदूळ निर्यात धोरणात नुकत्याच झालेल्या सुधारणांमागील तपशीलवार कारणे स्पष्ट करण्यात आली. भारताच्या तांदूळ निर्यात नियमांमध्ये अलीकडील बदलांमुळे निर्यातीसाठी उपलब्धता कमी न करता देशांतर्गत किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
सप्टेंबरच्या सुरुवातीला सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आणि बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लादले. “देशांतर्गत तांदळाच्या किमती वाढीचा कल दर्शवित आहेत आणि सुमारे 6 दशलक्ष टन धानाचे कमी उत्पादन आणि गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीत 11 टक्क्यांच्या वाढीचा अंदाज असल्यामुळे त्यात वाढ कायम राहू शकते,” असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
भारत दुसरा मोठा उत्पादकचीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. जागतिक बाजारपेठेत भारतातील तांदळाचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला आहे. त्यात 34.9 लाख टन बासमती तांदूळ होता. भारतातील चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.