Join us

नवीन वर्षाच्या आधी महागाईपासून दिलासा! एलपीजी सिलिंडर आजपासून एवढ्या रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 9:36 AM

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने वर्ष सुरू होण्याआधी मोठा दिलासा दिला आहे. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी करून ग्राहकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पूर्व भेट दिली आहे. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ३९.५० रुपयांनी कमी केली आहे. आता दिल्लीत १९ किलोचा गॅस सिलिंडर १७५७.५० रुपयांना मिळणार आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. आजपासून म्हणजेच २२ डिसेंबरपासून ही दरकपात लागू होणार आहे. 

एलपीजीच्या किंमतीतील या कपातीमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससारख्या व्यावसायिक एलपीजी वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे. याआधी व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीत १७९६.५० रुपये, मुंबईत १७४९ रुपये, कोलकात्यात १९०८ रुपये आणि चेन्नईमध्ये १९६८.५० रुपये होती. ३९.५० रुपयांच्या किमतीत कपात केल्यानंतर, व्यावसायिक सिलिंडर आता कोलकात्यात १८६९ रुपयांना, मुंबईत १७१० रुपयांना आणि चेन्नईमध्ये १९२९.५० रुपयांना मिळणार आहे.

Elon Musk यांचे Starlink आणतेय फ्लाइट इंटरनेट सर्व्हिस, जिओ-एअरटेलचं टेन्शन वाढणार?

गेल्या काही काळापासून, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमती जवळपास दर महिन्याला चढ-उतार होत आहेत. यापूर्वी १ डिसेंबर रोजी १९ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत बदलण्यात आली होती. तर १६ नोव्हेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ५७ रुपयांनी कमी करण्यात आली. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात ऑगस्टपासून कोणताही बदल झालेला नाही.

ऑगस्टमध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत झालेला बदल

३० ऑगस्ट २०२३ रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली होती. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि मुंबईत ९०२.५० रुपये आहे. तर चेन्नईमध्ये एलपीजी गॅसची किंमत ९१८.५० रुपये प्रति सिलेंडर आहे. एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होणारा बदल हा आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीतील चढ-उतारांवर अवलंबून असतो.

टॅग्स :गॅस सिलेंडरमहागाई