Cyber Crime : गेल्या काही वर्षात सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. फेक कॉलद्वारे लोकांना लाखो रुपयांना गंडा घातला जात आहे. हे प्रकार रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. या महिन्यापासून याची सुरुवात झाली आहे. फसवे कॉल्स थांबवण्यासाठी सरकारने तांत्रिक यंत्रणा तैनात केली आहे. जे दररोज १.३५ कोटी कॉल ब्लॉक करत आहेत. आतापर्यंत या यंत्रणेच्या माध्यमातून २,५०० कोटी रुपयांची फसवणूक थांबवण्यात यश आले असल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिली.
बहुतेक फसवे कॉल देशाबाहेरील सर्व्हरवरून येतात आणि सिस्टम अशा फसव्या कॉल्सपैकी बहुतेकांना ब्लॉक करण्यास सक्षम आहे. “आम्ही तुमच्या फोनवर येणारे मार्केटिंग कॉल आणि फसवे कॉल हाताळण्यासाठी एक संपूर्ण सिस्टीम लागू केली असल्याचे सिंधिया यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
दररोज १.३५ कोटी कॉल ब्लॉक
सरकारच्या नवीन सिस्टीममुळे सुमारे २.९ लाख फोन नंबर ब्लॉक केले गेले आहेत. तर सुमारे १८ लाख हेडर ब्लॉक केले गेले आहेत, जे संदेश पाठवण्यासाठी वापरले जात होते. मंत्री म्हणाले, की या व्यतिरिक्त भारताबाहेर सर्व्हर वापरणारे परंतु +91 क्रमांक (भारतीय क्रमांक) म्हणून सादर करणारे फसवणूक करणारे देखील यात डिटेक्ट केले जात आहेत. "आम्ही हे कॉल्स थांबवणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले आहे." यामुळे दररोज सरासरी १.३५ कोटी कॉल ब्लॉक केले जात आहेत.
फसव्या कॉलद्वारे फसवणूक
गेल्या काही वर्षांपासून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन सर्वसामान्यांचा पैसा हडप करत आहेत. डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट फ्रॉड, शॉपिंग स्कॅम, पार्ट टाईम जॉब, सेक्सटॉर्शन अशा विविध प्रकारे लोकांची फसवणूक करुन लुबाडलं जात आहे. याला रोखण्यासाठी आता सरकारस्तरावरुन प्रयत्न सुरू झाले आहे. मात्र, यानंतर नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन सरकारतर्फे केलं जात आहे.
लवकरच BSNL 5G सेवा लाँच होणार
पुढच्या वर्षी मे पर्यंत BSNL 5G सेवा सर्वांपर्यंत पोहच णार आहे. तर एप्रिलपर्यंत संतृप्ति योजनेअंतर्गत सर्वांसाठी 4G लाँच करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली. तसेच, दूरसंचार कायदा २०२३ अंतर्गत उर्वरित सर्व नियम डिसेंबरपर्यंत अधिसूचित करणे देखील त्यांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. BSNL 4G साठी एक लाख बेस स्टेशन तयार करण्याच्या योजनेवर काम सुरू असून त्यापैकी ५०,००० टॉवर्सचे बांधकाम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.