देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन-आयडियाला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मोठ्या कर्जाचा डोंगर असलेल्या या कंपनीच्या 16,133 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्याज थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. भारत सरकार आता या कंपनीचे सर्वात मोठे भागधारक बनले आहे. मात्र, कंपनीला एका खास अटीवर हा दिलासा देण्यात आला आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ही शिल्लक इक्विटीमध्ये रूपांतरित करण्यासाठी व्होडाफोन आयडिया सरकारला 10 रुपयांचे फेस व्हॅल्यू असलेले शेअर जारी करेल. दूरसंचार मंत्रालयाने 3 फेब्रुवारी रोजी यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे.
या अटीवर दिलासा
आदित्य बिर्ला समूहाकडून कंपनी चालवण्यासाठी आणि आवश्यक गुंतवणूक आणण्यासाठी निश्चित वचनबद्धता मिळाल्यानंतर सरकारने व्होडाफोन आयडियाच्या व्याज देय रकमेचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतल्याचे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी सांगितले. या निर्णयानंतर तोट्यात असलेल्या वोडाफोन आयडियामध्ये सरकारचा हिस्सा जवळपास 33 टक्के होईल. व्होडाफोन आयडियावर सुमारे दोन लाख कोटी रुपयांचे दायित्व आहे.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, आदित्य बिर्ला समूह ही कंपनी चालवेल आणि त्यासाठी आवश्यक गुंतवणूकही आणेल, अशी आम्ही दृढ वचनबद्धता मागितली होती. बिर्ला समूहाने यासाठी सहमती दर्शवली आहे आणि अशा प्रकारे आम्ही थकबाकीचे इक्विटीमध्ये रूपांतर करण्यास सहमती दर्शविली आहे.
किमान ३ खासगी कंपन्यांची गरज
अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारला भारतीय दूरसंचार बाजारपेठेत बीएसएनएल व्यतिरिक्त तीन कंपन्यांची उपस्थिती हवी आहे जेणेकरून ग्राहकांना त्याचा योग्य तो फायदा मिळू शकेल. सप्टेंबर 2021 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या दूरसंचार मदत पॅकेज अंतर्गत सरकारने व्होडाफोन आयडियाला थकबाकीदार दायित्वापासून दिलासा दिला आहे.
इतक्या कोटींचे शेअर जारी करणार
व्होडाफोन आयडियाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, इक्विटी शेअर्समध्ये रूपांतरित होणारी एकूण रक्कम 1,61,33,18,48,990 रुपये आहे. कंपनीला प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 16,13,31,84,899 इक्विटी शेअर्स जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांची इश्यू किंमतही 10 रुपये आहे.
व्होडाफोन आणि आयडियाचे विलीनीकरण झाल्यानंतर तयार झालेली नवीन कंपनी देशातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर होती. 2018 मध्ये 35 टक्के मार्केट शेअरसह 430 दशलक्ष मोबाइल ग्राहक होते. मात्र, आज कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. कंपनीचे २४.३ कोटी मोबाइल ग्राहक आहेत.