नवी दिल्ली : भारत सरकार रेल्वेची उपकंपनी असलेल्या आयआरसीटीसीमधील (IRCTC) 5 टक्के हिस्सा विकणार आहे. स्टॉक एक्स्चेंजवर ऑफर्स फॉर सेलद्वारे गुरुवारी आणि शुक्रवारी शेअर्सची विक्री केली जाईल. सरकारने IRCTC चे शेअर्स विकण्यासाठी 680 रुपये प्रति शेअर फ्लोअर प्राईस निश्चित केली आहे.
बुधवारी IRCTC चे शेअर्स 1.67 टक्क्यांनी वाढून 734.90 रुपयांवर बंद झाले. म्हणजेच सरकार बुधवारच्या बंद किंमतीपासून IRCTC चे शेअर्स 7 टक्के सवलतीने गुंतवणूकदारांना विकणार आहे. 4 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेलमध्ये बोलीसाठी उपलब्ध होतील. बिगर किरकोळ गुंतवणूकदार 15 डिसेंबरला विक्रीच्या ऑफरमध्ये सहभागी होऊ शकतील.
याचबरोबर, किरकोळ गुंतवणूकदार शुक्रवारी शेअर्ससाठी बोली लावू शकतील. ऑफर फॉर सेलमध्ये 25 टक्के म्युच्युअल फंड आणि विमा कंपन्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्यात आला आहे.
IRCTC शेअरने 3 वर्षात दिला 1048 टक्के रिटर्न
IRCTC चा IPO सप्टेंबर 2019 मध्ये आला होता, ज्याला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. कंपनीने 320 रुपये प्रति शेअर या दराने IPO आणला. हा शेअर 14 ऑक्टोबर 2019 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाला होता. तेव्हापासून IRCTC शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1048 टक्के रिटर्न दिला आहे. दरम्यान, IRCTC ही स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झालेली पहिली ई-कॉमर्स कंपनी आहे.
सरकार सातत्याने कमी करतंय हिस्सेदारी
IRCTC ही भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे, कंपनीच्या पोर्टलवर रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी रेल्वे तिकीट बुक करू शकतात. IRCTC ट्रेनमध्ये खाद्यपदार्थ देखील पुरवते. यासोबतच IRCTC अनेक टुरिस्ट ट्रेनही चालवते. 2019 मध्ये जेव्हा IPO आला, त्यानंतर सरकारचा हिस्सा 87.40 टक्क्यांवर आला. यानंतर, सरकारने पुन्हा 20 टक्के हिस्सा विकला, त्यानंतर सध्या भारत सरकारकडे IRCTC मधील 67.40 टक्के हिस्सेदारी आहे. हा ऑफर फॉर सेल पू्र्ण झाल्यानंतर सरकारची हिस्सेदारी 62.40 टक्क्यांपर्यंत खाली येईल. 2022-23 चे निर्गुंतवणूक लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सरकार IRCTC चे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकणार आहे.