Join us

सरकारला रिझर्व्ह बँकेकडून हवेत ३ लाख ६० हजार कोटी, बँकेचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 7:02 AM

रिझर्व्ह बँकेकडे अतिरिक्त असलेले ३ लाख ६० हजार कोटी रुपये केंद्र सरकारला हवे आहेत, पण बँकेने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँकेकडे अतिरिक्त असलेले ३ लाख ६० हजार कोटी रुपये केंद्र सरकारला हवे आहेत, पण बँकेने त्यास नकार दिला आहे. त्यामुळे दोघांमधील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. सरकारला हा पैसा लोकसभा निवडणुकीत वापरण्यासाठी हवा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.सध्या तेलाच्या किमती, कर्जमाफीचे निर्णय, डॉलरच्या तुलनेत घसरता रुपया यामुळे अर्थव्यवस्था फारशी चांगली नाही. शिवाय लोकसभा निवडणुका जवळ येत असताना, केंद्रातील सत्ताधारी पक्षाला काही लोकप्रियतेच्या घोषणा करायच्या असाव्यात. हे सारे करण्यासाठी निधी नसल्याने केंद्र सरकारने बँकेकडे ही मागणी केली असावी, असे सांगण्यात येत आहे.यापूर्वी रिझर्व्ह बँकेने २०१६-१७ मध्ये नियमित लाभांशाखेरीज ३०,६५९ कोटी रुपये दिले होते, तसेच २०१७-१८ मध्येही लाभांश व अतिरिक्त रक्कम मिळून ५० हजार कोटी रुपये दिले होते. आता बँकेकडे ९ लाख ५९ हजार कोटी अतिरिक्त आहेत. त्यातीलही एक तृतीयांश रक्कम केंद्र सरकारला हवी आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता, या अतिरिक्त रकमेचे सरकार व बँकेने संयुक्त व्यवस्थापन करण्याची गरज आहे, असे अर्थमंत्रालयाचे म्हणणे आहे....तर विपरित परिणामकेंद्र सरकार या अतिरिक्त निधीचा उपयोग सरकारी बँकांच्या निधीसाठी करेल. या बँकांचे नियामक या नात्याने रिझर्व्ह बँकेवर त्याचे विपरित परिणाम होतील. अतिरिक्त रक्कम केंद्राला दिल्याने बँकेचे भांडवल कमी होईल. त्यामुळे केंद्र सरकारला हा निधी देता येणे शक्य नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसरकार