नवी दिल्ली - बँकांचं भांडवल 2,11,000 कोटी रुपयांनी वाढवण्याचं मंत्रिमंडळानं ठरवल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले. त्यासाठी बजेटमध्ये प्रस्तावित केलेले 18 हजार कोटी रुपयांचे भांडवल बँकांना देण्यात येणार आहे. तसेच, बँकांमधील सरकारी हिस्सा कमी करण्यात येणार असून ते प्रमाण 52 टक्क्यांपर्यंत आणण्यात येणार आहे. या निर्गुंतवणुकीमुळे 35 हजार कोटी रुपयांचे भांडवल बँकांना मिळेल असे ते म्हणाले. तसेच, रिकॅपिटलायझेशन बाँड्स किंवा कर्जरोख्यांच्या माध्यमातून उर्वरीत भांडवल उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
येत्या काही महिन्यांमध्ये या संदर्भातील उपाय जाहीर करण्यात येणार असल्याचे जेटली यांनी सांगितले असून सरकारी बँकांमध्ये 2,11,000 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवण्यात येईल असे ते म्हणाले. परिणामी बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल आणि यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे ते म्हणाले.
दरम्यान जीएसटी ही सर्वात मोठी सुधारणा असून, परकीय गंगाजळी 400 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. इतिहासात पहिल्यांदाच परकीय गंगाजळी एवढी वाढली आहे. जानेवारी 2014 पासून त्यात 100 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे असे अर्थ खात्यातील अधिकारी एससी गर्ग यांनी सांगितले. 2017-18 या आर्थिक वर्षात महागाई 3.5 टक्के राहील. आर्थिकवर्ष संपेपर्यंत महागाई 4 टक्क्यांच्या पुढे जाणार नाही असे एससी गर्ग यांनी सांगितले.
मागच्या दोनवर्षात चालू खात्यातील आर्थिक तूट भरपूर कमी झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतमाला योजनेतंर्गत 34,800 किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत अशी माहिती अर्थ सचिव अशोक लव्हासा यांनी दिली. भारतमालाच्या पहिल्या टप्प्यात किनारपट्टी भागात 2 हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
पुढच्या पाचवर्षात 7 लाख कोटी रुपये खर्च करुन 83,677 किलोमीटरचे महामार्ग बांधण्यात येतील. त्यामुळे 14 कोटी रोजगार निर्माण होतील असे सरकारकडून सांगण्यात आले. भारतमाला योजनेतंर्गत 5 लाख 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला.