नवी दिल्ली : आर्थिक मंदीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. त्यावर कामही सुरू असून, कर कपात, सबसिडी आणि इतर प्रोत्साहन लाभ यांचा पॅकेजमध्ये समावेश असणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, प्रोत्साहन पॅकेजमुळे उद्योगांचा खर्च कमी होईल. व्यवसाय करणे अधिक सुलभ होईल, अशी व्यवस्थाही त्यातून उद्योगांना लाभेल. महसूल विभागाकडूनही काही उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यानुसार, प्रामाणिक करदात्यांना त्रास होणार नाही, याची खबरदारी सरकारी पातळीवर घेतली जाईल. छोट्या आणि प्रक्रियात्मक उल्लंघनासाठी मोठी कारवाई करण्याचे टाळले जाईल.पंतप्रधान मोदी यांनी अलीकडील आपल्या एका मुलाखतीत प्रोत्साहन पॅकेजचे संकेत दिले होते.मागणी सातत्याने घसरत असल्यामुळे औद्योगिक विश्वातून चिंता व्यक्त केली जात आहे. वस्तू वापर (कंझम्पशन) वाढविण्यासाठी लोकांच्या हातात अधिक पैसा पडणे आवश्यक आहे. तसेच वस्तूंच्या किमतीही कमी असणे आवश्यक आहे. त्यानुसार, कर कमी करून वस्तूंचे दर कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.|असोचेमचे अध्यक्ष बी.के. गोयंका यांनी सांगितले की, ‘प्रोत्साहन पॅकेजच्या माध्यमातून गंभीर हस्तक्षेप करण्याची सध्या अर्थव्यवस्थेला गरज आहे. आम्ही १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मोठ्या पॅकेजची सूचना केली आहे.’सूत्रांनी सांगितले की, वाहन क्षेत्रासाठी स्वतंत्र पॅकेज देण्याची मागणी या क्षेत्रातील प्रतिनिधींनी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबतच्या गेल्या आठवड्यातील बैठकीत केली होती. त्यावरही विचार चालू केला जात आहे. सूत्रांनी सांगितले की, काही मोठ्या बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या कोसळल्यामुळे देशात मंदीचे संकट आल्याचे मानले जात आहे.
मंदी रोखण्यासाठी सरकार देणार प्रोत्साहन पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 3:16 AM