Join us

मोदी सरकार Coal India मधील 3 टक्के हिस्सा विकणार; OFS अंतर्गत ओपन होईल ऑफर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 9:37 PM

ऑफर फॉर सेल 1 आणि 2 जून रोजी किरकोळ आणि बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील, असेही सरकारने सांगितले.

नवी दिल्ली : 1 जूनपासून ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत कोल इंडिया लिमिटेडमधील तीन टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी विकणार आहे, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारने दिली. तसेच, ऑफर फॉर सेल 1 आणि 2 जून रोजी किरकोळ आणि बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ओपन राहील, असेही सरकारने सांगितले.

केंद्र सरकार सध्या कोळसा उत्पादक कंपनीच्या 1.5 टक्के समभागासाठी 9.24 कोटी शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. याशिवाय, कंपनीकडे अतिरिक्त 9,24,40,924 (1.50 टक्के) इक्विटी शेअर्स विकण्याचा पर्याय असणार आहे. नियामक फाइलिंगनुसार, ओव्हर सबस्क्रिप्शनच्या बाबतीत समान भागभांडवल विकण्यासाठी ग्रीन शू पर्याय असणार आहे. आज व्यापार सत्र बंद झाल्यानंतर, कोल इंडियाचा शेअर बीएसईवर 241.20 रुपये आहे. त्यानुसार तीन टक्के समभागांची किंमत 4,400 कोटी रुपये आहे.

काय असते OFS?ऑफर फॉर सेल हा एक सोपा मार्ग आहे, ज्याद्वारे सार्वजनिक कंपन्यांचे प्रवर्तक एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे शेअर्स विकू शकतात आणि त्यांचे होल्डिंग कमी करू शकतात.

काय आहे कोल इंडिया?कोल इंडिया लिमिटेड (CIL) ही एक सरकारी कोळसा खाण कंपनी आहे, जी नोव्हेंबर 1975 मध्ये अस्तित्वात आली. स्थापनेच्या वर्षात 79 मिलियन टनच्या (MTs) माफक उत्पादनासह कोल इंडिया लिमिटेड आज जगातील सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आहे. कोल इंडिया लिमिटेड भारतातील आठ राज्यांमध्ये पसरलेल्या 84 खाण क्षेत्रांमध्ये आपल्या उपकंपन्यांद्वारे कार्यरत आहे. 1 एप्रिल 2020 पर्यंत कंपनीकडे 352 खाणी आहेत, त्यापैकी 158 भूमिगत, 174 ओपनकास्ट आणि 20 मिश्रित आहेत.

कोल इंडिया लिमिटेडच्या 26 प्रशिक्षण संस्था आणि 84 व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कोल मॅनेजमेंट (IICM) एक अत्याधुनिक व्यवस्थापन प्रशिक्षण 'सेंटर ऑफ एक्सलन्स' म्हणून भारतातील सर्वात मोठी कॉर्पोरेट प्रशिक्षण संस्था कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यरत आहे आणि बहु-अनुशासनात्मक कार्यक्रम आयोजित करते.

कोल इंडिया लिमिटेडच्या सात उत्पादक उपकंपन्या आहेत. यामध्ये ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (ECL), भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL), सेंट्रल कोलफिल्ड्स लिमिटेड (CCL), वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL), साउथ इस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL), नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (NCL) आणि महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड (MCL) यांचा समावेश आहे.

टॅग्स :व्यवसाय