Join us  

ईपीएफ खातेदारांना दिवाळी भेट; मिळणार ८.५ % व्याज 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 6:51 AM

Provident Fund : आणखी आनंदाची बाब म्हणजे ही व्याजाची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२०-२१ या आर्थिक वर्षात कर्मचारी भविष्य निधीवर (ईपीएफ) ८.५% व्याज दर देण्याच्या निर्णयास मंजुरी दिली आहे, अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी शुक्रवारी दिली. आणखी आनंदाची बाब म्हणजे ही व्याजाची रक्कम कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या ५ कोटींपेक्षा अधिक सदस्यांच्या खात्यामध्ये लगेचच जमा होणार आहे.

ही रक्कम म्हणजे कर्मचार्यांना दिवाळीपूर्वीच मिळालेली मोठी भेट ठरणार आहे. ईपीएफवर ८.५% व्याज देण्याचा निर्णय ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने यंदाच्या मार्चमध्येच घेतला होता. केंद्रीय श्रममंत्री या मंडळाचे अध्यक्ष असतात. विश्वस्त मंडळाचा निर्णय केंद्र सरकारकडे पाठविण्यात आलेला होेता. त्यास केंद्रीय वित्त मंत्रालयाने आता मान्यता दिली आहे.

ईपीएफओने २०१९-२० मध्ये ८.५% व्याज दर दिला होता. तो ७ वर्षांतील म्हणजेच २०१२-१३ पासूनचा नीचांकी दर ठरला होता. त्याआधी २०१८-१९ मध्ये ८.६५% व्याज दर देण्यात आला होता. तसेच २०१६-१७ मध्येही ८.६५%, तर २०१७-१८ मध्ये ८.५५% व्याज दर ईपीएफओने दिला होता. 

खात्यात रक्कम जमा झाली का?खात्यात पीएफची किती रक्कम आहे, हे तुम्हाला आता सहजच जाणून घेता येईल. ईपीएफ खात्यासाठी तुमचा जो रजिस्टर केलेला मोबाइल क्रमांक आहे, त्यावरून तुम्ही ही माहिती मिळवू शकता. त्यासाठी ०११-२२९०१४०६ या क्रमांकावर मिसकॉल द्या. कॉल आपोआप कट होईल आणि तुमच्या मोबाइलवर रकमेची माहिती देणारा मेसेज येईल. मात्र त्यासाठी मोबाइलबरोबरच तुमचे पॅन, आधार व यूएएन लिंक असणे आवश्यक आहे.

करा एक एसएमएस : पीएफ खात्यातील रक्कम समजून घेण्यासाठी आणखी एक मार्ग आहे एसएमएसचा. तुम्ही ७७३८२९९८९९ या क्रमांकावर EPFOHO UAN ENG एवढेच लिहून पाठवायचे. तसे केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल, ज्यात त्या रकमेचा उल्लेख असेल. 

टॅग्स :भविष्य निर्वाह निधी