Join us  

GST Collection: 'जीएसटी'मधून केंद्र सरकारची मोठी कमाई! गेल्या वर्षीच्या तुलनेत 18 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 5:41 PM

GST Collection in February 2022 : फेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे, तर फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत संकलन 26 टक्क्यांनी वाढले आहे.

नवी दिल्ली : फेब्रुवारी 2022 मधील जीएसटी (GST) संकलनाची फेब्रुवारी 2022 साठी आकडेवारी जाहीर झाली आहे. फेब्रुवारी 2022 साठी एकत्रित GST महसूल 1,33,026 कोटी रुपये इतका जाहीर करण्यात आला आहे. जीएसटी संकलनाने 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये, जीएसटी संकलन फेब्रुवारी 2021 च्या तुलनेत 18 टक्के अधिक आहे, तर फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत संकलन 26 टक्क्यांनी वाढले आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये जीएसटी संकलन 1,33,026 कोटी रुपये होते. तर सीजीएसटी (CGST) संकलन 24,435 कोटी, एसजीएसटी (SGST) संकलन 30,779 कोटी, आयजीएसटी (IGST) 67,471 कोटी रुपये आणि उपकर म्हणजेच सेस 10,340 कोटी रुपये होते. फेब्रुवारी महिन्यात नियमित सेटलमेंटनंतर केंद्र सरकारचा महसूल 50,782 कोटी रुपये आहे, तर राज्यांचा एकूण महसूल 52,688 कोटी रुपये आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये GST महसूल संकलन 18 टक्क्यांनी वाढले असताना, फेब्रुवारी 2020 च्या तुलनेत संकलन 26 टक्क्यांनी वाढले आहे. फेब्रुवारी महिन्यात आयातीतून महसुलात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अर्थ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे की, फेब्रुवारी महिना 28 दिवसांचाच आहे. त्याच वेळी, फेब्रुवारीमध्ये कोरोना महामारीच्या ओमिक्रॉन संसर्गामुळे, राज्यांनी आंशिक लॉकडाऊन, रात्री कर्फ्यू आणि निर्बंध देखील पाळले. दरम्यान जीएसटी संकलनाने 1.30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडण्याची ही पाचवी वेळ आहे. त्याच वेळी, प्रथमच, जीएसटी सेस संकलन 10,000 कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. कारण ऑटोमोबाईल क्षेत्रातून रिकव्हरी परत आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या वर्षात पाचव्यांदा मासिक जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने 1.30 लाख कोटींचा टप्पा पार केला आहे. देशात जीएसटी लागू झाल्यापासून पहिल्यांदाच जीएसटी अधिभार संकलनाने 10,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यातून अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये आर्थिक व्यवहार विशेषतः वाहन उद्योगातील विक्री पुन्हा पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

फेब्रुवारी 2021 मध्ये महाराष्ट्रात 16,104 कोटी रुपये तर गोव्यात 344 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलन झाले होते, तर फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्रात 19,423 कोटी रुपये तर गोव्यात 364 कोटी रुपये जीएसटी महसुलाचे संकलन झाल्यामुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्राच्या जीएसटी महसूल संकलनात  21 टक्के  तर गोव्याच्या महसूल संकलनात 6 टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :जीएसटीव्यवसाय