लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलवर सरकारने भरमसाट कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर २०२२ या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकार ५.४५ लाख काेटी रुपयांनी मालामाल झाले आहे. त्यापैकी केंद्राने ३.०८ तर राज्य सरकारांनी २.३७ लाख काेटी रुपयांची कमाई केली आहे. सरकारने मे महिन्यात इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली हाेती. तरीही सरकारला माेठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. तरीही सर्वसामान्य जनतेला अजुनही महाग पेट्राेल आणि डिझेलपासून दिलासा मिळालेला नाही.
पेट्राेलियम मंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत याबाबत माहिती दिली. एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात तेली यांनी सांगितले, की सररकारला पेट्राेलियम उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेल्या महसूलात उत्पादन शुल्क, रस्ते व इन्फ्रा उपकर, कृषी उपकर, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क व इतर अधिभारांचा समावेश आहे.
मे २०२२ मध्ये सरकारने पेट्राेलवर ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये प्रतिलिटर उत्पादन शुल्कात कपात केली हाेती. त्यानंतर केरळ आणि पश्चिम बंगाल वगळता सर्व राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला हाेता. मे महिन्यात पेट्राेल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले हाेते. तेल कंपन्यांना सरकार ३० हजार काेटी रुपयांचे अनुदानही देणार आहे.
पेट्राेल-डिझेलचे दर करांमुळे हाेतात दुप्पट
पेट्राेल आणि डिझेलची मूळ किंमत सध्या ५७.१६ रुपये प्रतिलिटर आहे. त्यावर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क आहे १९.९० रुपये प्रतिलिटर. राज्य सरकार त्यावर व्हॅट आणि अधिभार आकारते. त्यामुळे पेट्राेलपंपांवर प्रत्यक्ष विक्री किंमत जवळपास दुप्पट हाेते.
कधी कमी हाेणार दर?
सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त आहे. महागाई घटविण्यासाठी आरबीआयने व्याजदरांत माेठी वाढ केली आहे. अजुनही वाढ हाेण्याचा अंदाज आहे. अशावेळी सरकारने पेट्राेल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा सल्ला आरबीआयच्या अहवालातून दिला हाेता. मात्र, सध्या तेल कंपन्यांचा ताेटा भरून निघेपर्यंत दरकपात हाेणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
कच्च्या तेलाचे दर काेसळले
गेल्या वर्षी युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर १४० डाॅलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले हाेते. ते आता ७२ डाॅलर्स प्रति बॅरलवर आले आहेत. त्यातही सरकारला रशियाकडून आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा १६ डाॅलर्स प्रति बॅरल कमी दराने कच्चे तेल मिळत आहे. तरीही पेट्राेल आणि डिझेलच्या दरात घट केली जात नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"