नवी दिल्ली : केंद्र सरकार 'लखपती दीदी' योजनेअंतर्गत दोन कोटी महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची योजना आखत आहे. सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी देशातील महिलांना प्रोत्साहन देणे, हा यामागील उद्देश आहे.
भारतात आज स्वांतत्र्यदिन (Independence Day 2023) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही गावात गेल्यावर तुम्हाला बँक वाली दीदी, अंगणवाडी दीदी आणि औषधी दीदी सापडतील. पण, गावोगावी दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे माझे स्वप्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
आता असे दिसून येत आहे की पुरुषांपेक्षा अधिक महिला STEM चा अभ्यास करत आहेत. G-20 ने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाचे भारताचे व्हिजन देखील स्वीकारले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले. तसेच, आपल्या मुलींवर कोणतेही अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
दरम्यान, 'लखपती दीदी' या मुद्द्यावर अधिक माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'लखपती दीदी' योजना काही राज्यांमध्ये आधीच लागू करण्यात आली आहे. आता त्याअंतर्गत दोन कोटी महिलांना प्रशिक्षण देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. तसेच, या योजनेद्वारे महिलांना प्लंबिंग, एलईडी बल्ब बनवणे आणि ड्रोन चालवणे व दुरुस्ती करणे यासारख्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाईल, असेही अधिकाऱ्यांने सांगितले.