नवी दिल्ली : साेनेखरेदीमध्ये हाेणारी फसवणूक राेखण्यासाठी केंद्र सरकारने घेतलेल्या हाॅलमार्किंग अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी २५६ जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. लवकरच देशभरात या निर्णयाची व्याप्ती वाढविली जाईल. हाॅलमार्किंग यंत्रणेमध्ये सहभागी हाेणाऱ्या सराफा व्यावसायिकांची संख्या चार पटीने वाढली आहे तर, आतापर्यंत ४.५ काेटी दागिन्यांचे हाॅलमार्किंग करण्यात आले आहे.
२५६ जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली. या जिल्ह्यांमध्ये किमान एक हाॅलमार्किंग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हाॅलमार्किंगबाबत मंत्रिमंडळासाठी एक अहवाल सादर करण्यात आला हाेता. त्यानुसार, ही यंत्रणा विनाअडथळ्याची सुरू आहे. लवकरच देशभरात ती लागू करण्यासाठी पावले उचलली जातील.
महाराष्ट्र, तामिळनाडू व गुजरात ही तीन राज्ये हाॅलमार्किंगमध्ये आघाडीवर आहेत. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक २४, गुजरातमध्ये २३ आणि महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली. मुंबई, नागपूर, जळगाव, नाशिक, पुणे, काेल्हापूर, औरंगाबाद, अकाेला आणि ठाणे आदी जिल्ह्यांत याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
देशभरात ९७६ केंद्रे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हाॅलमार्किंग लागू केल्यानंतर भारतीय मानक ब्युराेकडे नाेंदणी करणाऱ्या सराफा व्यावसायिकांच्या संख्येत ४ पट वाढ झाली आहे.
- १.२७ लाख सराफा व्यावसायिकांनी नाेंदणी केली आहे. देशभरात ९७६ मान्यताप्राप्त हाॅलमार्किंग केंद्र कार्यन्वित करण्यात आले आहेत. ही संख्या लवकरच वाढणार आहे.
- २३ जून २०२१ पासून लागू केलेल्या नियमानुसार १४, १८ आणि २२ कॅरेट साेन्याच्या दागिन्यांवर हाॅलमार्किंग करणे बंधनकारक आहे