GPF Interest Rate Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अर्थ मंत्रालयानं सामान्य भविष्य निर्वाह निधी (GPF) आणि इतर भविष्य निर्वाह निधीसाठी व्याजदर जाहीर केले आहेत. १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत, जीपीएफ आणि इतर तत्सम फंड्सवर ७.१ टक्के व्याज दिलं जाईल. जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी सरकारनं जीपीएफ आणि तत्सम लिंक्ड फंडांवरील व्याजदरात बदल केलेला नाही.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागानुसार (DEA) २ जानेवारी, २०२४ रोजी, २०२३-२४ या वर्षातील सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि तत्सम फंड्सवर १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ७.१ टक्के दरानं व्याज दिलं जाईल. सरकारनं गेल्यावेळेप्रमाणेच यंदाही व्याजदर कायम ठेवले आहेत. जीपीएफवर पीपीएफ प्रमाणेच व्याज मिळत आहे. जीपीएफ दर हे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) दरांसारखेच असतात. खाली नमूद केलेल्या सर्व फंडांवर ७.१ टक्के दरानं व्याजही मिळेल.
सामान्य प्रोविडेंट फंड म्हणजे काय?
सामान्य भविष्य निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह निधीचा एक प्रकार आहे जो फक्त भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो. सरकारमधील प्रत्येकजण आपल्या पगाराचा काही भाग सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करू शकतो. कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याला त्याच्या कालावधीत जमा केलेले पैसे आणि व्याज मिळते. अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीत जीपीएफ व्याजदराचा आढावा घेते.