RINL News: केंद्र सरकार आपल्या आणखी एक बड्या कंपनीचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी टाटा समूहाची टाटा स्टील, जेएसडब्लू स्टील आणि अदानी समूहात थेट स्पर्धा असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरच्या सुरुवातील या कंपन्यांनी हिस्सेदारीसाठी स्वारस्य दाखविले होते. केवळ या तीन नाही, तर आणखी ७ कंपन्या या सरकारी कंपनीची हिस्सेदारी घेण्यासाठी उत्सुक आहेत. या कंपनीचे मूल्यांकन या डिसेंबर अखेर होण्याची शक्यता आहे.
या सरकारी कंपनीचे नाव आहे, राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्तविषयक समितीने जानेवारी २०२१ मध्ये RINL मधील निर्गुंतवणुकीला मान्यता दिली होती. गेल्या आठवड्यात गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत पांडेय यांनी या कंपनीच्या विक्रीसंदर्भात प्रक्रिया सुरु असल्याचा दावा केला होता. RINL आणि तिच्या उपकंपन्यांना तसेच संयुक्त उपक्रमातील संस्थांमध्ये सुद्धा केंद्र सरकार हिस्सेदारी विक्रीसाठी प्रयत्नशील आहे.
देशातील सर्वोत्तम ६ स्टील उत्पादक कंपन्यांमधील एक कंपनी
RINL ही कंपनी देशातील सर्वोत्तम ६ स्टील उत्पादक कंपन्यांमधील एक कंपनी आहे. या कंपनीची एकूण वार्षिक क्षमता ७५ लाख टन आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये या कंपनीची एकूण उलाढाल २८,२१५ कोटी रुपये होती आणि कंपनीला ९१३ कोटींचा नफा झाला होता. कामगार संघटना या निर्गुंतवणुकीला कडाडून विरोध करत आहेत. संघटनांनी खासगी उद्योग समूहाला ही कंपनी विक्री करण्यास विरोध दर्शविला आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) मध्ये RINL चे विलिनिकरण करण्याचा प्रस्ताव संघटनांनी दिला आहे. पण केंद्र सरकारने तो नाकारल्याचे सांगितले जात आहे. ईटीने सूत्रांच्या माहिती आधारे याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये सरकारच्या हिस्सेदारीचे व्यवस्थापन करणाऱ्या DIPAM ने यंदाच्या मार्च महिन्यात निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी परवानगी मागितली होती. तसेच कंपनीच्या मूल्यांकनासाठी मूल्यांकनकर्ताच्या नियुक्तीचा प्रस्ताव मागितला होता.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"