Rajiv Jain on Adani Group: हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाला मोठा तडाखा बसला. मात्र, यातून आता अदानी समूह बऱ्यापैकी सावरलेला दिसत आहे. मोठ्या संकटात असताना अदानी समूहाला राजीव जैन यांनी मोलाची मदत केली. राजीव जैन गौतम अदानी यांचे मित्र आणि GQG पार्टनर्सचे प्रमुख आहे. अदानी समूहाचे तारणार असलेल्या राजीव जैन यांनी मोठे विधान केले आहे. मोदी सरकार सत्तेत असो किंवा नसो, अदानी ग्रुपवर कोणताही परिणाम नाही, प्रगती करत राहणार, असा विश्वास राजीव जैन यांनी व्यक्त केला आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. गुंतवणूकदारांचा विश्वास पूर्णपणे उडाला होता. त्यानंतर राजीव जैन यांनी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये १५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. मार्चपासून आतापर्यंत राजीव जैन यांनी अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये २.५ बिलियन डॉलरची गुंतवणूक केली आहे. राजीव जैन यांनी अदानी समूहाची पाठराखण केली आहे.
अदानी ग्रुपवर कोणताही परिणाम नाही, प्रगती करतच राहणार
देशाच्या पायाभूत क्षेत्रात अदानी समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याचा मोदी सरकारशी काहीही संबंध नाही. मोदी सरकार सत्तेत राहो अथवा न राहो, अदानी समूहाच्या कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. अदानी समूहाच्या कंपन्या प्रगती करत राहतील, असा विश्वास राजीव जैन यांनी व्यक्त केला आहे. तसेच आता ते भारतात आणखी गुंतवणूक करण्याचा विचार करीत आहेत. अदानी समूहाच्या कंपन्यांवर सतत विश्वास दाखवत असून, अदानींच्या कंपन्यांवरील जोखीम त्यांनी नाकारली आहे.
दरम्यान, आम्हाला खाजगी क्षेत्रातील बँका, आयटी कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्या आवडतात. परंतु आम्हाला वाटते की, भविष्य हे पायाभूत सुविधा कंपन्यांचे आहे आणि सध्या त्याकडे कमी लक्ष दिले जात आहे, असेही राजीव जैन यांनी म्हटले आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.