अदानी समूहासाठी एक आनंदाची बातमी आहे. अदानी समूहात मोठी गुंतवणूक करणाऱ्या यूएस आधारित गुंतवणूक कंपनी जीक्युजी पार्टनर्सनं (GQG Partners) आणखी एक मोठा करार केला आहे. जीक्युजीनं बुधवारी बल्क डीलद्वारे अदानी पॉवरमधील भागीदारी खरेदी केली.
जीक्युजी पार्टनर्स इमर्जिंग मार्केट फंड (GQG Partners Emerging Market Fund) आणि गोल्डमॅन सॅश जीक्युजी पार्टनर्स इंटरनॅशनलनं (Goldman Sachs GQG Partners International) अदानी पॉवरमधील ३.९ टक्के भागभांडवल ४२४२ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. एक्सचेंजवर उपलब्ध बल्क डील डेटावरून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, प्रमोटर ग्रुपचा भाग असलेल्या वर्ल्डवाईड इमर्जिंग मार्केट्स होल्डिंगनं १.२ टक्के हिस्सा विकला आहे. आणखी एक प्रवर्तक संस्था अॅफ्रो एशिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटनं (Afro Asia Trade and Investments) या करारातील आपली संपूर्ण भागीदारी विकली.
प्रवर्तक समूह संस्थांनी मिळून अदानी पॉवरमधील सुमारे ८.१ टक्के हिस्सा विकला आहे. वर्ल्डवाईड इमर्जिंग मार्केट्स होल्डिंगचा जून २०२३ पर्यंत कंपनीमध्ये ५ टक्के हिस्सा होता आणि अॅफ्रो एशिया ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटकडे (Afro Asia Trade & Investments) ६.८८ टक्के हिस्सा होता.
जीक्युजीकडून समूहात मोठी गुंतवणूकयूएस शॉर्ट सेलर हिंडेनबर्गनं केलेल्या आरोपानंतर जीक्युजी पार्टनर्सनं मार्केट सेंटिमेंट्सच्या विरोधात जाऊन अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. मार्चमध्ये, त्यांनी १५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती आणि अदानी एंटरप्रायझेससह चार अदानी कंपन्यांमध्ये भागीदारी घेतली. तेव्हापासून, गुंतवणूक फर्मनं अदानी समूहातील कंपन्यांमधील आपली भागीदारी लक्षणीयरीत्या वाढवली आहे. त्यातून फर्मचा समूहावरील आत्मविश्वास दिसून येतो.
या कंपन्यांमधील वाढवला हिस्साजूनमध्ये, जीक्युजीनं अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ८,२६५ कोटी रुपयांचे अतिरिक्त स्टेक विकत घेतले. जून २०२३ पर्यंत जीक्युजीकडे अदानी एंटरप्रायझेसमध्ये २.६७ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये ३.५ टक्के भागीदारी आहे. जूनमध्येच, यूएस-आधारित गुंतवणूक फर्मनं अदानी ट्रान्समिशनमध्ये १,६७६ कोटी रुपयांना सुमारे १.९ टक्के हिस्सा खरेदी केला.