नवी दिल्ली : देशातील सरकारी आणि खासगी बँकांमध्ये सध्याच्या घडीला एफडीवर फारच कमी व्याज मिळत आहे. अशा परिस्थितीत काही बँकांनी ग्राहकांना एफडी केल्यानतंर बऱ्याच सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य विमा (health insurance) त्यापैकी एक आहे. सध्या डीसीबी बँक आणि आयसीआयसीआय बँक एफडी केल्यानंतर ग्राहकांना आरोग्य विम्याची सुविधा देत आहे.
या बँकांमध्ये उपलब्ध आरोग्य विमा सुविधांबद्दल जाणून घेऊया ...
एफडीवरील आरोग्य विमा - कोणतीही बँक आपल्या एफडीवर आरोग्य विमा प्रदान करते. त्यासाठी संबंधीत बँक दुसर्या विमा कंपनीसोबत करार करते. त्याचबरोबर वेगवेगळ्या बँकांनी दिलेल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्येही मोठा फरक आहे. डीसीबी बँकेने ग्राहकांना आरोग्य विमा देण्यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डशी करार केला आहे. तसेच, आयसीआयसीआय बँक सुद्धा एफडी केल्यानंतर ग्राहकांना आरोग्य विम्याची सुविधा प्रदान करीत आहे.
ठराविक व्याज दरावर आरोग्य विमा - डीसीबी बँक आणि आयसीआयसीआय बँकेकडून दिल्या जाणाऱ्या व्याज दरांवर ग्राहकांना आरोग्य विमा दिला जात आहे. परंतु या विम्यासाठी दोन्ही बँकांनी वेगवेगळ्या कालावधी मर्यादा निश्चित केल्या आहेत. डीसीबी बँकेकडून एफडीवर 700 दिवसांसाठी आरोग्य विमा दिला जात आहे. तर आयसीआयसीआय बँकेकडून 2 वर्षांसाठी आरोग्य विम्याची सुविधा देण्यात येत आहे.
'इतक्या' रकमेवर मिळणार आरोग्य विमा - बर्याच बँकांमध्ये किमान आणि जास्तीत जास्त रकमेच्या एफडीवर आरोग्य विम्याची सुविधा दिली जाते. उदाहरणार्थ, डीसीबी बँकेकडून हेल्थ प्लस पॉलिसीसाठी किमान 10 हजार रुपयांची एफडी करणे अनिवार्य आहे. तर दुसरीकडे, आयसीआयसीआय बँकेत 2 ते 3 लाख रुपयांच्या एफडीवर आरोग्य विमा सुविधा दिली जात आहे.
आरोग्य विमा मर्यादित - बँकांकडून एफडीवर मिळणाऱ्या आरोग्य विम्यावर मर्यादित कव्हर असते. उदाहरणार्थ, आयसीआयसीआय बँकेकडून गंभीर आजाराच्या उपचारांसाठी जवळपास 1 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जात आहे. त्याचबरोबर या पॉलिसीमध्ये वयोमर्यादा देखील आहे. जसे की, डीसीबी बँकेच्या हेल्थ प्लस पॉलिसीसाठी वय 50 आणि 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
आरोग्य विमा घेताना या गोष्टी लक्षात ठेवा - जर तुम्ही अशा पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी फक्त एफडी करत असाल तर तुम्हाला यामधील सर्व नियम व अटी लक्ष देऊन वाचाव्या लागतील. कारण बर्याच वेळा बँकांकडून 2 वर्षांच्या एफडीवर आरोग्य विमा केवळ 1 वर्षासाठी आरोग्य विमा दिला जातो. याशिवाय, बँकांनी जास्तीत जास्त आणि किमान निधीची एफडी केली तर आरोग्य विमा संरक्षणाची रक्कमही बँकांनी निश्चित केली आहे. त्यामुळे तुम्ही सर्व महत्त्वपूर्ण सूचना योग्यरित्या वाचल्या पाहिजेत.