Join us

Investment : गुंतवणूकीचा जबरदस्त ऑप्शन, महिन्याला गुंतवा ₹५००; जमा होईल लाखोंचा फंड 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 1:15 PM

गुंतवणूक जितकी चांगली असेल आणि दीर्घकालावधीसाठी असेल, तितके त्याचे रिटर्नही चांगले मिळतील.

Investment Tips: गुंतवणूक हा शब्द ऐकताना जरा भारी वाटतो, अनेकदा मोठ्या रकमेची चर्चा होत असं जाणवतं. परंतु जर या शब्दाला तुम्ही घाबरत असाल तर मनातून ही गोष्ट काढून टाका. गुंतवणूक ही केवळ मोठ्या रकमेतूनच होत नाही. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही केवळ ५०० रुपयांपासूनही याची सुरुवात करू शकता. ५०० रुपये काढणं आपल्याला सहज शक्य होतं. परंतु गुंतवणूकीत सातत्य असणं महत्त्वाचं आहे.

गुंतवणूक जितकी चांगली असेल आणि दीर्घकालावधीसाठी असेल, तितके त्याचे रिटर्नही चांगले मिळतील. अशा अनेक स्कीम्स आहेत, ज्यात दीर्घकालावधीसाठी ५०० रुपयांची गुंतवणूक करत राहिलात तर तुम्ही काही वर्षांमध्ये लाखोंची रक्कम जोडू शकता. पाहूया जर तुम्ही ५०० रुपयांची गुंतवणूक केली तर त्यावर किती रिटर्न मिळेल. 

एसआयपीएसआयपीद्वारे तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. दरम्यान, एसआयपीही बाजाराशी लिंक्ड आहे आणि यात मोठी जोखीम मानली जाते. परंतु गेल्या काही वर्षांत एसआयपीमध्ये खूप चांगला परतावा मिळाला आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांत एसआयपीची लोकप्रियताही झपाट्यानं वाढलीये. एसआयपीमध्ये सरासरी १२ टक्के परतावा मिळतो, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा परिस्थितीत, लोक दीर्घकाळात एसआयपीद्वारे भरपूर नफा कमावतात. चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम कधीही वाढवू शकता. यामुळे तुमचा नफा अधिक होतो.

एसआयपीमध्ये १२ टक्क्यांचे रिटर्न मिळतायत असं समजू. जर तुम्ही महिन्याला ५०० रुपये यात गुंतवले तर १५ वर्षांनंतर १२ टक्के व्याजाच्या हिशोबानं तुम्हाला २,५२,२८८ रुपये मॅच्युरिटीवर मिळतील. तर २० वर्षांनी तुम्हाला मॅच्युरिटीवर ४,९९,५७४ रुपए मिळतील.

पीपीएफजर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक हवी असेल, तर पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. ही एक सरकारी योजना आहे ज्यामध्ये फक्त ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. त्यात दरवर्षी किमान ५०० रुपये गुंतवणे आवश्यक आहे. या योजनेत तुम्हाला ७.१ टक्के दराने चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो. ही योजना १५ वर्षांत मॅच्युअर होते. यामध्ये तुम्ही दरमहा ५०० रुपये जमा करत असाल तर तुम्हाला वार्षिक ६००० रुपये जमा करावे लागतील. पीपीएफ कॅल्क्युलेटरनुसार, १५ वर्षांमध्ये तुम्ही याद्वारे १,६२,७२८ रुपये जमा करू शकाल. दुसरीकडे, जर तुम्ही ही योजना आणखी ५ वर्षे सुरू ठेवली तर २० वर्षांत तुम्हाला २,६६,३३२ रुपये मिळतील.

पोस्ट ऑफिस आरडीपोस्ट ऑफिस आरडीदेखील याचा उत्तम पर्याय आहे. याचा ५ वर्षांचा कालावधी असतो. सध्या यावर ६.५ टक्के दरानं व्याज दिलं जात आहे. यामध्ये तुम्ही १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. जर या योजनेत तुम्ही महिन्याला ५०० रुपयांप्रमाणे वर्षाला ६००० हजार रुपये जमा होतील. ५ वर्षांमध्ये तुमची ही एकूण गुंतवणूक ३०००० हजार रुपय होईल. यावर तुम्हाला ५,४९८ रुपये व्याजाच्या स्वरुपात मिळतील. मॅच्युरिटीवर तुम्हाला ३५,४९८ रुपये मिळतील.

(टीप - यात सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गुंतवणूकपैसापोस्ट ऑफिसपीपीएफ