नवी दिल्ली : कंपनीला आकर्षक आणि आधुनिक स्वरूप देऊन बाजारपेठेत आपली छाप निर्माण करण्यासाठी १०८ वर्षे जुन्या असलेल्या इंटरनॅशनल बिझनेस मशिन्स (आयबीएम) या कंपनीने मागील काही वर्षांत अनेक वर्षांपासून सेवेत असलेल्या जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले, असे कोर्टातील एका दाव्यावरील सुनावणीदरम्यान साक्षीदाराने म्हटले.
वयोमानाच्या दृष्टीने भेदभाव करण्यात आला, असा आरोप करून आयबीएमच्या एका जुन्या विक्री प्रतिनिधीने कोर्टात दावा दाखल केला आहे. या दाव्यावरील सुनावणीच्या वेळी साक्ष देताना आयबीएमचे माजी उपाध्यक्ष (मनुष्यबळ) अॅलन वाईल्ड यांनी सांगितले की, गेल्या पाच वर्षांत आयबीएम कंपनीने ५० हजार ते १ लाख जुन्या कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले. तरुणांची भरती करून कंपनीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जुन्या कर्मचाºयांना नोकरीतून काढल्याप्रकरणी जॉनाथन लँगली याने कोर्टात दावा केला आहे. वयोमानावरून भेदभावाचा आरोप आयबीएमने फेटाळला आहे. वाढत्या वयामुळे मलाही नोकरीतून काढण्यात आले, असा आरोप ६१ वर्षीय जॉनाथन लँगली यांनी केला असून, मंगळवारी त्याच्या वकिलाने कोर्टात याप्रकरणी दावा दाखल केला. अमेरिकेतील प्रोपब्लिकाने मार्चमध्ये एक अहवाल प्रसिद्ध केला होता. आयबीएमने मागच्या पाच वर्षांत ४० आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या २० हजार कर्मचाºयांची कपात केल्याचे या अहवालात म्हटले होते.कंपनीविरुद्ध अनेक राज्यांत दावे दाखलकंपनी १०८ वर्षे जुनी आहे. दरवर्षी ५० हजार लोकांना रोजगार दिला जातो. नवीन कर्मचाºयांच्या प्रशिक्षणावर जवळपास ५० कोटी डॉलर खर्च केले जातात, असे सांगत कंपनीने वयोमानावरून भेदभाव केला जात असल्याच्या आरोपाचा इन्कार केला. आयबीएम कंपनीविरुद्ध मॅनहटन, कॅलिफोर्निया, पेन्सल्व्हेनिया, टेक्साससह अन्य राज्ये व शहरांतही अनेक दावे दाखल करण्यात आले आहेत.