नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेने आपल्या सात सर्कलमधील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्कल बेस्ड ऑफीसर्सच्या ३ हजार ८५० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेमध्ये महाराष्ट्र आणि गोवा विभागासाठी ५१७ आणि ३३ पदांवर भरती होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.
पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील करिअर सेक्शनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मच्या मदतीने नोंदणी करू शकतात. या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ ऑगस्ट आहे. तसेच ऑनलाइन शुल्क भरण्याची अखेरची तारीखही १६ ऑगस्ट आहे. अर्जदार आपल्या ऑनलाइन सबमिट केलेल्या फॉर्मची प्रिंट ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत काढून घेऊ शकतात.
एसबीआयच्या भरतीची लिंक पाहण्यासाठी इथे क्लिक करा
एसबीआयने आपल्या सात सर्कलमधील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्कल बेस्ड ऑफीसर्सच्या कायम पदांसाठी हे अर्ज मागवले असून,या पदांची सर्कलप्रमाणे विभागणी पुढीलप्रमाणे आहे. अहमदाबाद (गुजरात) ७५० पदे, बंगळुरू (कर्नाटक) ७५० पदे, भोपाळ (मध्य प्रदेश, छत्तीसगड) २९६ आणि १०४ पदे, चेन्नई (तामिळनाडू) -५५० पदे, हैदराबाद (तेलंगाणा) - ५५० पदे, जयपूर (राजस्थान) - ३०० पदे, महाराष्ट्र ( मुंबईला वगळून महाराष्ट्र, गोवा) ५१७ आणि ३३ पदे .
या भरती प्रक्रियेसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्ज करणारा उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. अर्जदाराकडे कुठल्याही व्यावसायिक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारीपदावर काम केल्याचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा. अर्जदार उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी ३० वर्षांहून अधिक नसावे.