Join us

मस्तच! ₹3 लाखांच्या कर्ज योजनेसंदर्भात PM मोदींची मोठी घोषणा, केवळ 5% व्याजानं कर्ज देतंय सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 6:31 PM

सरकार या योजनेंतर्गत तब्बल 13,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेत म्हटले आहे... 

पुढील वर्षात अर्थात 2024 मध्ये संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी, केंद्रातील मोदी सरकारने पीएम विश्वकर्मा योजनेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सरकारने 17 सप्टेंबर रोजी ही योजना सुरू केली आहे. यातच आता, सरकार पीएम विश्वकर्मा योजनेंतर्गत तब्बल 13,000 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका निवडणूक सभेत म्हटले आहे. 

कुणाला होणार फायदा - विश्वकर्मा योजनेत प्रामुख्याने 18 पारंपरिक व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, इतर व्यवसायातील कारागीरही यात सहभागी होऊ शकतात. सध्या ज्या कारागिरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे, त्यांत, सुतार, बोट बांधणारे, शस्त्रे तयार करणारे, लोहार, टूल किट तयार करणारे, कुलूप तयार करणारे, सोनार, कुंभार, शिल्पकार (शिल्पकार, दगडी कोरीव काम करणारे), दगड फोडणारे, पादत्राने तयार करणारे कारागीर आणि गवंडी यांचा समावेश होतो. याशिवाय, टोपली/चटई/झाडू तयार करणारे, विणकर, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी तयार करणारे, न्हावी, माळा तयार करणारे, धोबी, शिंपी आणि मासेमारीसाठी लागणारे जाळे तयार करणाऱ्या कारागिरांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 

अशी आहे योजना -कारागिरांना आणि शिल्पकारांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्राच्या माध्यमाने मान्यता दिली जाईल. या योजनेंतर्गत संबंधित व्यक्तीला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. याच्या पहिल्या टप्प्यात, व्यवसाय सुरू करण्यासाठी एक लाख रुपये एवढे कर्ज दिले जाते. तर, दुसऱ्या टप्प्यात व्यवसाय विस्तारासाठी 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. म्हत्वाचे म्हणजे, हे कर्ज केवळ 5 टक्के व्याजदराने दिले जाते. याचवेळी, सरकार ब्रँडिंग, ऑनलाइन मार्केट ॲक्सेस यासाठीही मदत करेल.

सविस्तर माहितीसाठी... - या योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी pmvishwakarma.gov.in ला भेट द्या. या शिवाय, 18002677777 वरही कॉल करू शकता अथवा pm-vishwakarma@dcmsme.gov.in वर ईमेलही करू शकता. 

टॅग्स :नरेंद्र मोदीभाजपाबँकव्यवसाय