नवी दिल्ली - घरगुती गॅस हा रोज लागणाऱ्या गोष्टींपैकी एक असल्यामुळे तो खरेदी केल्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. याच कारणामुळे देशातील नागरिकांची प्रचंड कोंडी झाली आहे. सध्या पेट्रोल, डिझेल, घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती आकाशाला भिडल्या असून महागाईनेही कळस गाठला आहे. बहुतांश नागरिक कमी उत्पन्नात कुटुंबाचा खर्च चालवित आहेत. मात्र, इंधन आणि गॅसदरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच, सरकारने घरगुती गॅसबाबत एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
गॅसधारक ग्राहकांना आपल्या आवडीच्या एजन्सीकडून गॅसची खरेदी करता येणार आहे. कारण, आपणास हव्या असलेल्या एजन्सीकडे गॅस ट्रान्सफर करण्याची सूट देण्यात आली आहे. सध्या एकाच कंपनीकडे गॅस ट्रान्सफर करता येणार आहे. पहिल्या टप्प्यात चंढीगड, पुणे, रांची, कोईम्बतूर आणि गुडगाव येथे ही सेवा सुरु करण्यात आली आहे. लवकरच संपूर्ण देशात ही योजना लागू होईल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव तरुण कपूर यांनी दैनिक जागरणशी बोलताना सांगतिले की, सध्या प्रायोगित तत्त्वावर ही योजना सुरु करण्यात आली असून योग्यरितीने यशस्वी झाल्यास ग्राहकांना दुसऱ्या कंपनीच्या एजन्सीमध्ये गॅस ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळेल. त्यामुळे, गॅस एजन्सींमध्ये ग्राहकांना उत्तम सुविधा देण्याबाबत स्पर्धा होईल, असेही कपूर यांनी म्हटले.
नवीन योजनेमध्ये गॅस एजन्सीचा कुठलाही रोल असणार नाही. ग्राहकांना ऑनलाईन एलपीजी सिलेंडर भरतेवेळी कोणत्या एजन्सीकडून गॅस घ्यायचा हे ठरविण्याचा अधिकार आहे. सध्या एका गॅस एजन्सीमधून दुसऱ्या गॅस एजन्सीत जाण्याची सुविधा ग्राहकांना नाही. त्यामुळे, जेव्हा संपूर्ण देशात ही सर्व्हीस सुरू होईल, तेव्हा ग्राहकांना याचा लाभ मिळेल, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, कोरोना काळात जीवनाश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्याऐवजी सरकार दरवाढ करीत असल्याने नागरिक सरकारला दोष देत आहेत. विविध ग्राहक संघटनांसह महागाई कमी करण्याची मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे.