Join us  

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेल ३०%पर्यंत स्वस्त; दर कपातीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 7:16 AM

गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी कमी केल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : फॉर्च्युन ब्रँडच्या नावाने आपल्या उत्पादनांची विक्री करणारी खाद्य तेल कंपनी अदानी विल्मरने खाद्य तेलाच्या किमतीत प्रति लीटर ३० रुपयांपर्यंत कपात करण्याची घोषणा सोमवारी केली. अदानी विल्मरच्या या निर्णयामुळे इतर ब्रँड्सच्या दरांतही कपात होणे अटळ आहे, असे सूत्रांनी सांगितले. जागतिक बाजारात खाद्य तेलाच्या दरात घसरण झाल्यामुळे भारतात तेलाच्या दरात कपात करण्यात आली आहे. सर्वाधिक कपात सोयाबीन तेलाच्या दरात झाली असून. नव्या किमतीची पाकिटे लवकरच बाजारात पोहोचतील, असे सूत्रांनी सांगितले.

धारा ब्रँड अंतर्गत खाद्य तेल विक्री करणाऱ्या मदर डेअरीने सोयाबीन आणि राईस ब्रॅन ऑईलच्या दरात प्रती लीटर १४ रुपयांची अलीकडेच कपात केली होती. केंद्रीय अन्न मंत्रालयाने ६ जुलै रोजी खाद्य तेलाच्या दरांवर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती. जागतिक बाजारातील किमतीतील घसरणीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात यावा, असे निर्देश त्यावेळी सरकारने कंपन्यांना दिले होते.

तेल उत्पादक देशांकडून कच्च्या पामतेलाच्या निर्यातीवरील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे. जागतिक बाजार पडलेला असल्यामुळे भारतातील खाद्य तेलाच्या किमती पुढील महिन्यात आणखी कमी होतील. - सुधाकरराव देसाई, इंडियन व्हेजिटेबल ऑइल प्रोड्युसर्स असोसिएशनचे अध्यक्ष, इमामी ॲग्रोटेकचे सीईओ

ग्राहकांना लाभ देण्याच्या हेतूने निर्णय

- अदानी विल्मरने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, जागतिक बाजारातील दर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळवून देण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर कंपनीने तेलाच्या किमती ३० टक्कांपर्यंत कमी केल्या आहेत. 

- गेल्या महिन्यातही कंपनीने दर कपात केली होती. अदानी विल्मरचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आंग्शू मलिक यांनी सांगितले की, नव्या किमतीची तेलाची खेप लवकरच बाजारात पोहोचेल. 

- १५ जुलै पूर्वीची खरेदी असलेली तेलाची खेप २५ जुलै पर्यंत बाजारात येईल.

- गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्य तेलाच्या किमती १० ते १५ रुपयांनी कमी केल्या होत्या. दर कपात करणाऱ्या कंपन्यांत अदानी विल्मरसह मदर डेअरी आणि इमामी ॲग्रोटेक यांचा समावेश होता. 

टॅग्स :अदानी