नवी दिल्ली : देशात कुशल कामगारांची मोठी कमतरता असल्याची कबुली देत केंद्र सरकारने बांधकामसह उच्च विकासदर असलेल्या २१ क्षेत्रांत २०२२ सालापर्यंत ३४७० लाख कुशल मनुष्यबळाची गरज असल्याचे सांगितले. श्रम आणि रोजगारमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सोमवारी लोकसभेत एका उत्तरात ही माहिती दिली.देशात मोठ्या प्रमाणात कौशल्याधिष्ठित मनुष्यबळाची कमतरता असल्याबाबत काही सदस्यांनी लोकसभेत चिंता व्यक्त केली होती. यावर तोमर म्हणाले, राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाद्वारे २००८-०९मध्ये कुशल मनुष्यबळाबाबत एक अभ्यास करण्यात आला होता. यानुसार, बांधकाम क्षेत्रासह विविध २१ सेक्टरमध्ये देशात २०२२ पर्यंत सुमारे ३४७० लाख कुशल कामगारांची आवश्यकता आहे.तोमर यांनी सांगितले की, सरकारने कौशल्य विकासासाठी २००९ मध्ये एक राष्ट्रीय धोरण तयार केले होते. सर्वांना चांगल्या रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या धोरणाचा हेतू होता, तसेच जागतिक बाजारात भारताची स्पर्धात्मकता निश्चित करण्यासाठी नवी कौशल्ये, ज्ञान आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त पात्रता असलेल्या मनुष्यबळाची निर्मिती करणे हा यामागचा हेतू होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कुशल मनुष्यबळाची देशात मोठी कमतरता
By admin | Published: August 12, 2014 3:20 AM