नवी दिल्ली : ग्रीसमधील कर्ज संकटामुळे भारताच्या सॉफ्टवेअर आणि इंजिनिअरिंग निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. तसेच भारतीय नागरिक आपला पैसा बँकांमधून काढून घेण्यासाठी घाई करू शकतात, अशी भीती आज केंद्रीय सचिवांनी तसेच औद्योगिक संघटनांनी व्यक्त केली. केंद्रीय वित्त सचिव राजीव महर्षी यांनी म्हटले की, असे संकट उद्भवलेच तर त्याचा सामना करण्याची तयारी सरकार करीत आहे. ग्रीकमधील संकटाचा भारतावर थेट परिणाम होणार नाही. तथापि, बँकांमधून पैसे काढून घेण्याचे प्रमाण वाढू शकते, तसेच भांडवलाचा प्रवाहही बाधित होऊ शकतो. ग्रीक संकटाचा थेट परिणाम युरोपवर होणार आहे. युरोपात व्याजदर वाढतील. युरोपात व्याजदर वाढल्यास भारतात येणारा भांडवलाचा प्रवाह कुंठित होईल. केंद्रीय वाणिज्य सचिव राजीव खेर यांनी सांगितले की, ग्रीसमधील संकटाचा भारताच्या निर्यातीवर थेट परिणाम होऊ शकतो. इंजिनिअरिंग निर्यातदार संघटना ‘ईईपीसी’ने म्हटले की, भारतातून युरोपात इंजिनिअरिंग निर्यात होते. तिच्यावर परिणाम होईल. असोचेमने म्हटले की, भारतीय अर्थव्यवस्था युरोप केंद्रीत आहे. युरोपवर परिणाम झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)महर्षी म्हणाले की, नेमके काय होईल, याची ठोस भविष्यवाणी करणे कठीण आहे. अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील व्याजदर वाढलेच तर त्याचा भारतातील गुंतवणूक आणि पैसे काढण्यावर परिणाम होईल; पण गुंतवणूकदार पैसे कोठे घेऊन जातील, हे सांगणे अवघड आहे. सरकार रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात आहे. रिझर्व्ह बँकेला जे काही करणे शक्य आहे, ते ती करीलच.
ग्रीस संकटामुळे भारताच्या निर्यातीवर परिणाम होणार
By admin | Published: June 30, 2015 2:24 AM