ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - ग्रीसमधील आर्थिक संकटाचे पडसाद भारतातील शेअर बाजारावरही दिसून आले असून सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार तब्बल ५३५ अंशांनी घसरला आहे. तर निफ्टीमध्ये १६६ अंशांची घसरण झाली आहे.
दिवाळखोरीला आलेल्या ग्रीसमुळे युरोपियन महासंघावर सध्या आर्थिक संकट घोंगावत आहे. ग्रीस युरोपियन संघातून बाहेर पडल्यास त्याचा फटका युरोपियन महासंघातील देशांना बसेल. यात प्रामुख्याने जर्मनीला सर्वाधिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. ग्रीसमध्ये सर्व सरकारी बँका सहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतील अशी घोषणा सोमवारी करण्यात आली. याचे पडसाद भारतासह आशियातील सर्व प्रमुख शेअर बाजारांवर दिसून आले. सोमवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक्स ५३५ अंशांनी घसरुन २७ हजारावर घसरला. तर निफ्टी १६६ अंशांनी घसरुन ८,२१४ अंशांवर स्थिरावला.