मुंबई : युरोझोन आणि ग्रीसमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर आर्थिक निर्बंध लागू करण्याची अपरिहार्य परिस्थिती ग्रीसवर ओढवली असून, यामुळे ग्रीसच नव्हे तर तेथील मंदीची सावली जगातील विविध देशांच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. तातडीचे उपाय म्हणून ग्रीसचे पंतप्रधान एलिक्सिस त्सिप्रास यांनी ६ जुलैपर्यंत देशातील बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले असून एटीएममधूनही दिवसाकाठी ६० युरोपेक्षा जास्त पैसे काढण्यास मनाई केली आहे. ग्रीसमधील परिस्थितीमुळे तेथील नागरिकांत तर भीतीचे वातावरण पसरले आहेच, पण याचे हादरे युरोपासह आशिया खंडातही बसण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱ्या जगातील उगवत्या अर्थव्यवस्था म्हणून गणना होणाऱ्या चीन आणि भारत या दोन्ही देशांना याचे सौम्य झटके बसले आहेत. मात्र, या संकटातून सावरण्यासाठी आपण सज्ज असल्याचा दावा दोन्ही देशांतून होत आहे. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करणाऱ्या ग्रीसला मुख्य फटका बसला तो युरोपियन सेन्ट्रल बँकेकडून. या बँकेने ग्रीसच्या आर्थिक समस्येवर तोडगा म्हणून वित्तपुरवठा करण्यास नकार दिल्याने ग्रीसची कोंडी झाली आणि त्यातून कडक वित्तीय निर्बंध उचलणे ग्रीसला भाग पडले. (प्रतिनिधी)ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे तब्बल दीड अरब युरोचे कर्ज फेडायचे आहे. याआधी कडक अटींमुळे या देशाने मदतीचे पॅकेज नाकारले होते. मात्र, आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे.ग्रीसच्या पंतप्रधानांनी मिळणाऱ्या प्रस्तावित मदत पॅकेजवर जनमत चाचणी घ्यायचे ठरवले आहे. ही जनमत चाचणी ५ जुलैला होणार आहे.
ग्रीसला मंदीचे ग्रहण; अनेक देशांना हादरे
By admin | Published: June 30, 2015 2:33 AM