Join us

ग्रीसमधील सार्वमताने आशियात तेल घसरले

By admin | Published: July 06, 2015 10:57 PM

ग्रीसने कर्जदारांनी घातलेल्या अटी जाचक असल्याचे रविवारी झालेल्या सार्वमताद्वारे स्पष्ट केल्यानंतर आशियातील बाजारात सोमवारी तेलाचे भाव खाली आले.

सिंगापूर : ग्रीसने कर्जदारांनी घातलेल्या अटी जाचक असल्याचे रविवारी झालेल्या सार्वमताद्वारे स्पष्ट केल्यानंतर आशियातील बाजारात सोमवारी तेलाचे भाव खाली आले. ग्रीसच्या या भूमिकेमुळे युरोझोनमधून तो बाहेर पडण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे.सकाळच्या सत्रात अमेरिकेची महत्त्वाची कंपनी वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे (डब्ल्यूटीआय) तेल आॅगस्टच्या डिलिव्हरीसाठी बॅरलमागे १.८८ अमेरिकन डॉलरने खाली येऊन ५५.०५ डॉलरवर आले तर ब्रेंट कच्चे तेल ५० सेंटस्ने खाली येऊन ५९.८२ अमेरिकन डॉलरवर आले.सोमवारी सकाळी ग्रीसच्या मतदारांनी जाचक अटींना नकार दिल्याचे जाहीर होताच आशियाच्या बाजारपेठेत सकाळचे सत्र सुरू होताच मोठ्या प्रमाणावर भाव खाली येतील, असे आम्हाला दिसते, असे सिंगापूरमधील सीएमसी मार्केटस्चे बाजार विश्लेषक निकोलस तेवो यांनी म्हटले. ग्रीसने दिलेल्या निकालाचा परिणाम हा आर्थिक संस्थांनी घातलेल्या अटी काहीशा शिथिल होण्यात किंवा युरोझोन करन्सी युनियनमधून ग्रीस पूर्णपणे बाहेर पडण्यात होऊ शकतो, असे तेवो म्हणाले. बाजारपेठेचा विचार केला तर हे दोन्ही पर्याय जोखमीचेच आहेत, असेही ते म्हणाले. जागतिक बाजारपेठेत तेलाचा अतिरिक्त साठा असताना अमेरिकेचे कच्चे तेल सतत दाखल होत असल्यामुळे तसेच इराणच्या आण्विक कार्यक्रमाला रोखण्यासाठी पाश्चिमात्य राष्ट्रांकडून होत असलेल्या वाटाघाटींचाही तेलाच्या किमतीवर आधीच दबाब आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अन्य आर्थिक संस्थांनी ग्रीसला संकटातून बाहेर काढण्यासाठी घातलेल्या अटी खूपच जाचक असल्याचे ग्रीसच्या नागरिकांनी सार्वमताद्वारे स्पष्ट केले.