लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पूर्वी महिन्याचा किराणा माल भरणे ही जिकीरीची गोष्ट होती. सामान घरांपर्यंत आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी लागत असे. हल्ली माल घरपोच दिला जाऊ लागला आहे. निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे विक्रेत्यांनी क्विक डिलिव्हरीची सुविधा सुरु केली आहे. परिणामी मागील पाच वर्षात ग्राहक नेहमीपेक्षा दुप्पट खरेदी करु लागले आहेत, असे दिसून आले आहे.
लोकांच्या खरेदीविक्रीच्या सवयीबाबत रिसर्च फर्म कंतारने जुलै महिन्याच्या जारी केलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे. लोक रोजच्या वापरातील वस्तू वारंवार तसेच अधिक प्रमाणात खरेदी करू लागले आहेत. ग्राहकांच्या बदललेल्या या सवयींशी किरकोळ विक्रेत्यांनीही आता जुळवून घ्यावे लागत आहे. दरमहिन्याला खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंचे प्रमाण मात्र घटल्याचे दिसून आले आहे.
ऑर्डर्स १५ ते २० टक्के वाढल्या पार्ले प्रोडक्ट्सचे वरिष्ठ विपणन प्रमुख कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले की, क्चिक कॉमर्स आणि इ-कॉमर्सच्या सुविधेमुळे लोक गरजेपक्षा अधिक सामान आधीच भरू लागले आहेत. रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तूच्या ऑर्डर्समध्ये १५ ते २० टक्के वाढ झाली आहे.
१० मिनिटांत सामान घरात
रोजच्या वापरातील वस्तूंच्या संबंधित जाणकारांनी सांगितले की, क्चिक डिलिव्हरीमुळे लोकांना सामान झटपट मिळू लागले आहे. ब्लिंकिट आणि झेप्टोसारखे प्लॅटफॉर्म ग्राहकाना सामान १० मिनिटात पोहचवण्याचा दावा करतात.
मागच्या चारपैकी एका तिमाहीत २ ग्राहकांनी खरेदी केलेल्या रोजच्या वापरातील वस्तूंची संख्या सरासरी १९९ ते २०२ इतकी होती, असे कंतारच्या आकडेवारीत म्हटले आहे.
अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी विक्रेते ऑनलाईन डिलिव्हरी प्लॅटफॉर्मची मदत घेत आहेत. यात रिलायन्स रिटेल आणि स्पेंसर रिटेल सारख्या स्टोअर्सचा समावेश आहे. हे विक्रेतेही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन ऑर्डर्स स्वीकारु लागले आहेत. पूर्वी ग्राहकांकडून महिन्याला भरला जाणारा किराणा अधिक प्रमाणात होता. यात खरेदी केल्या जाणाऱ्या एकूण वस्तूंचे प्रमाण आता कमी झाले आहे.
१५६ वेळा ग्राहक वर्षभरात रोजच्या वापरातील वस्तूंची खरेदी करीत आहेत. दर ५६ तासांनी ही खरेदी केली जात आहे.
८० इतक्या वेळा ग्राहक पाच वर्षापूर्वी दरवर्षाला रोजच्या वापरातील वस्तूंची खरेदी करीत होते. ऑनलाइन खरेदीच्या सोयीमुळे हे प्रमाण आता जवळपास दुप्पट वाढले आहे.