Join us

कृषी विभागाचे भुईमूग बियाणाचे नियोजन कोलमडले

By admin | Published: February 03, 2016 2:54 AM

विदर्भात उन्हाळी भुईमूगाचे २२ हजार हेक्टर क्षेत्र असले तरी त्यासाठी लागणारे बियाणे उपलब्ध करून देण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे.

रुपेश उत्तरवार,  यवतमाळविदर्भात उन्हाळी भुईमूगाचे २२ हजार हेक्टर क्षेत्र असले तरी त्यासाठी लागणारे बियाणे उपलब्ध करून देण्यात कृषी विभाग अपयशी ठरला आहे. विभागाचा अंदाज आणि नियोजन कोलमडले आहे. महाबीज कंपनीचे बियाणे अनुदानात वितरित करण्यात येत आहे. परंतु हे बियाणे शेतकऱ्यांनी नाकारले आहे. पर्यायाने भुईमूगाच्या बियाण्यांची अचानक प्रती बॅग ६०० ते ८०० रुपये वाढ झाली असून त्याचा फायदा आंध्रप्रदेश, गुजरातमधील कंपन्या उठवित आहेत. सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडीला प्राधान्य दिले. पऱ्हाटी उपटून शेतकरी भूईमुगाची लागवड करीत आहेत. यामुळे कृषी विभागाचा अंदाज चुकला आहे. जिल्ह्यात भुईमूग बियाणाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही हीच स्थिती निर्माण झाली आहे.विदर्भात २२ हजार हेक्टरवर भुईमूगाची लागवड होते. याच संधीचा फायदा घेत थेट मध्यप्रदेश आणि गुजरातच्या कंपन्यांनी विदर्भात बियाणे विक्रीसाठी आणले आहे. या कंपन्यांनी बियाण्याचे दर ३० टक्के वाढविले आहे. अचानक झालेल्या दरवाढीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे.काही दिवसांपूर्वी भुईमूग बियाण्याचे दर २० किलोच्या बॅगला २४०० ते २६०० रूपये होते. आता ३१०० ते ३२०० रूपयांवर पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, बॅगवर २० किलोचे दर ४००० रूपये लिहिलेले आहेत. यातून व्यापाऱ्यांनाच मोठा नफा होणार असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे.भुईमूग बियाणे पुरवठ्यात कृषी खात्याचा रामभरोसे कारभार उघड झाला. या विभागाचा अंदाज चुकल्याने आधीच दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर महाबीजचे बियाणे खरेदी करण्याची वेळ आली आहे. परप्रांतीय कंपन्या विदर्भातील भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. कृषी विभागाच्या नियोजनशून्यतेचा हा फटका मानला जात असून संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.