नवी दिल्ली : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे चेअरमन सुशील चंद्र यांनी कार्यभार स्वीकारताच आयकर अधिकाऱ्यांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. करांचा आधार वाढवा, शक्य असेल तिथे वाद टाळा, असे त्यात म्हटले आहे. सुशील चंद्र यांनी १ नोव्हेंबर रोजी सीबीडीटीप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी लगेच अधिकाऱ्यांसाठी एक परिपत्रक जारी करून एकूण सात बाबी प्राधान्याने अधोरेखित केल्या आहेत. प्रामाणिक करदात्यांचा योग्य सन्मान करा, तसेच कर चोरीच्या प्रकरणांत कुठलीही भीती न बाळगता कारवाई करा, असेही त्यांनी यात म्हटले आहे.देशात करविषयक कायद्यांचे योग्य पालन व्हावे, यासाठी हे परिपत्रक सीबीडीटीप्रमुखांनी जारी केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, आयकर अधिकाऱ्यांनी निष्पक्ष, पारदर्शक आणि तथ्यांवर आधारित काम करावे. प्रामाणिक करदात्यांच्या सोयीकडे लक्ष द्यावे. या बाबी कर अधिकाऱ्यांनी सिद्धांतासारख्या पाळायला हव्यात. करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, तसेच उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली करणे यासाठी अधिकाऱ्यांनी शक्य ते सर्व उपाय करावेत.सीबीडीटीप्रमुखांनी म्हटले की, कर आधार विस्तारित करण्यासाठी कर विभाग तंत्रज्ञानात्मक डाटा बेसची मदत घेईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कर आधार वाढवा, शक्य असल्यास वाद टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2016 5:56 AM