मुंबई: भारताच्या विकास वाढीचा दर येत्या काळात कमी होणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. देशांतर्गत मागणी घटल्याचा परिणाम भारताच्या जीडीपीवर होईल, असं बँकेनं म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.५ टक्के असेल, असा अंदाज एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जागतिक बँकेनं वर्तवला होता. मात्र आता त्यात कपात करुन जागतिक बँकेनं हा आकडा ६ टक्क्यांवर आणला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला सध्या मरगळ आली असून येत्या काही दिवसांत अर्थक्षेत्राची स्थिती आणखी खालावेल, असा धोक्याचा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. काही आर्थिक तिमाहांपूर्वी भारताच्या जीडीपी वाढीचा दर चीनपेक्षाही जास्त होता. तो आता बांगलादेश आणि नेपाळपेक्षा कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या जीडीपी वाढीचा दर ७.५ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था केवळ ५ टक्क्यांनी वाढली. गेल्या ६ वर्षांमधील हा निच्चांक आहे. उत्पादनांना असलेली देशांतर्गत मागणी घटल्यानं आणि सरकारनं खर्चात कपात केल्यानं भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग मंदावल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात मूडीजनंदेखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ६.२ टक्क्यांऐवजी ५.८ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला होता. जीडीपीच्या वाढीवर परिणाम झाल्यानं सरकारचा महसूल घटेल, असं मूडीजनं म्हटलं होतं.
बांगलादेश, नेपाळ विकासदरात भारताला मागे टाकणार; वर्ल्ड बँकेचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 5:40 PM