बंगळुरू : नुकत्याच संपलेल्या तिमाहीत भारताचा वृद्धीदर वाढून ६.६ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे, असे रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. तथापि, येत्या काही महिन्यांत जीएसटीमुळे चिंतेची स्थिती राहील, असे जाणकारांना वाटते.रॉयटर्सने केलेल्या सर्वेक्षणात ४0 पेक्षा जास्त अर्थतज्ज्ञांनी सहभाग घेतला. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वृद्धीदर घसरून ६.१ टक्क्यांवर गेला होता. हा गेल्या दोन वर्षांतील नीचांक ठरला होता. त्यात आता सुधारणा झाली असल्याचे ताज्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीत वृद्धीदर ६.६ टक्के होईल, असा अंदाज आहे. त्याची व्याप्ती ५.७ टक्के ते ७.२ टक्के इतकी असू शकते. त्यामुळे आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत चीनच्या मागे जाईल. गेल्या तिमाहीत चीनचा वृद्धीदर ६.९ टक्के होता. चीन अजूनही जगातील सर्वोच्च कामगिरी करणाºया अर्थव्यवस्थांत समाविष्ट आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मोठ्या किमतीच्या नोटा बंद करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. चलनातील ८६ टक्के नोटा बाद झाल्यामुळे काही महिने देशातील ग्राहक मागणी घसरली होती. या धक्क्यातून अर्थव्यवस्था सावरली असल्याचे ताज्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. ताज्या सर्वेक्षणात वृद्धीदर ६.६ टक्के राहील, असा अंदाज असला तरी ही वाढ अल्पकालीन राहण्याचा धोका आहे. कारण जुलैमध्ये केलेल्या सर्वेक्षणात वृद्धीदर ६.९ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. एक महिन्यात त्यात घसरण दिसत आहे.सूक्ष्म, छोट्या, मध्यम उद्योगांना फटका...- अर्थव्यवस्थेत अनिश्चितता दिसून येत आहे. नव्या वस्तू व सेवा कायद्याच्या (जीएसटी) अंमलबजावणीवर बरेच काही अवलंबून राहील.- लार्सन अँड टुब्रो फायनान्स होल्डिंगच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रूपा रेगे नितसुरे यांनी सांगितले की, जीएसटीमुळे सूक्ष्म, छोट्या आणि मध्यम उद्योग-व्यवसायांना फटका बसल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीचा मोठा धक्का या क्षेत्राला बसला होता. त्यातून सावरत असतानाच जीएसटीमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
जीडीपीचा वृद्धीदर ६.६ टक्क्यांवर जाणार, आगामी काही महिन्यांत मात्र चिंतेची स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 1:14 AM