Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशाचा आर्थिक विकासदर राहणार ०.२ टक्के

देशाचा आर्थिक विकासदर राहणार ०.२ टक्के

मार्च महिन्यात या पतमापन संस्थेने देशाचा विकासदर २.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:31 AM2020-04-30T03:31:16+5:302020-04-30T06:45:20+5:30

मार्च महिन्यात या पतमापन संस्थेने देशाचा विकासदर २.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

The growth rate will be 0.2 percent | देशाचा आर्थिक विकासदर राहणार ०.२ टक्के

देशाचा आर्थिक विकासदर राहणार ०.२ टक्के

नवी दिल्ली : चालू वर्षामध्ये देशाचा आर्थिक विकासदर ०.२ टक्क्यांवर येण्याची भीती असल्याचा अंदाज मूडीज इन्व्हेंस्टर्स सर्व्हिसने व्यक्त केला आहे. मार्च महिन्यात या पतमापन संस्थेने देशाचा विकासदर २.५ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे जगभर लॉकडाउन सुरू असून, भारतीय अर्थव्यवस्थेलाही त्याचा फटका बसला आहे. यामुळे मूडीजने आपल्या सुधारित अंदाजामध्ये विकासदर कमी होण्याचे संकेत दिले आहेत. भारताबरोबरच जी-२० या देशांच्या अर्थव्यवस्थाही ५.८ टक्क्यांनी संकोचण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात या पतमापन संस्थेने जाहीर केलेल्या अनुमानांमध्ये जागतिक अर्थव्यवस्था २.६ टक्के दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने प्रथम चीन आणि त्या पाठोपाठ जगातील अनेक देशांना संकटामध्ये आणले. हा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय वापरण्यात येत असून, त्यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था ठप्प झाल्या आहेत. तसेच जागतिक अर्थव्यवस्थेवरही त्याचा विपरीत परिणाम दिसून येत आहे. परिणामी जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांच्या वाढीचा अंदाज बदलला आहे.
जी-२० देशांपैकी भारताच्या अर्थव्यवस्थेची सन २०२० या एका वर्षात ०.२ टक्के वाढ होण्याचा सुधारित अंदाज आहे. पुढील वर्षी (२०२१) अर्थव्यवस्था ६.२ टक्के वाढू शकेल असा अंदाजही मूडीजने व्यक्त केला आहे. मागीलवर्षी (२०१९) भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर ५.३ टक्के राहिला आहे.
भारताने ४० दिवसांचे लॉकडाउन जाहीर केले असले तरी दुसऱ्या टप्प्यात मुख्यत: ग्रामीण भागामध्ये काही सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतीची कामे सुरू झाली आणि अर्थव्यवस्थेची चाके काही प्रमाणात फिरू लागली. त्याचप्रमाणे काही शहरी भागातही सरकारने दुकाने व काही उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्याने अर्थव्यवस्था काहीशी हलण्यास प्रारंभ झाला. यामुळे मंदीचा प्रभाव कमी होण्यास हातभार लागला आहे.
भारत सरकारने उद्योगांना काही आर्थिक सवलती जाहीर केल्या आहेत. त्याचप्रमाणे दुसरे पॅकेजही लवकरच जाहीर होण्याचा अंदाज असून, त्यामुळे उद्योग विश्वाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. लॉकडाउनमुळे झालेले नुकसान यामुळे काही प्रमाणात भरून निघण्याची शक्यता उद्योग व्यवसायांना वाटते आहे.
जगभरातील प्रगत अर्थव्यवस्थांना कोरोना व्हायरसने जबरदस्त फटका बसण्याचा अंदाज आहे. जगातील अव्वल मानली जाणारी अमेरिकन अर्थव्यवस्था चालू वर्षात ५.७ टक्क्यांनी संकोच पावण्याचा अंदाज या अहवालात वर्तविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ब्रिटन (७ टक्के), इटली (८.२ टक्के), जपान (६.५ टक्के) आणि फ्रान्स (६.३ टक्के) अशा प्रमाणात या अर्थव्यवस्था संकोच पावतील, असे मूडीजच्या तज्ज्ञांचे मत आहे. या अंदाजांपेक्षाही अधिक प्रमाणात अर्थव्यवस्थांचा संकोच होण्याची शक्यता व्यक्त करून या जागतिक साथीचा किती परिणाम होतो त्यावर ते निश्चित होईल, असे मूडीजने स्पष्ट केले आहे.
मागील सप्ताहात अचानक घसरलेल्या खनिज तेलाच्या किमतीबाबतही या अहवालात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू वर्षात ब्रेन्ट स्पॉटची सरासरी किंमत ३५ अमेरिकन डॉलर प्रतिबॅरल राहण्याचा अंदाज आहे. डब्ल्यूटीआय स्पॉटची सरासरी किंमत ३० डॉलर राहण्याचा अंदाजही व्यक्त केला गेला आहे. पुढील वर्षात (२०२१) ब्रेन्ट आॅइलची किंमत सरासरी ४५ डॉलरपर्यंत वाढण्याची शक्यता असून, डब्ल्यूटीआय आॅइल ४० डॉलरची सरासरी गाठेल, असा अंदाजही मूडीजच्या अहवालात आहे.
>भारत, चीन, इंडोनेशियाची होणार वाढ
जगावर मंदीचे सावट पसरले असून, आगामी काळात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकोच पावण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. जी-२० या देशांपैकी भारत, चीन आणि इंडोनेशिया या केवळ तीन देशांच्या अर्थव्यवस्था थोड्या प्रमाणात का होईना वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. चालू वर्षात चीनमधील अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर १ टक्का राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे इंडोनेशिया या देशाची अर्थव्यवस्थाही वाढण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: The growth rate will be 0.2 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.