नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमुळे देशाच्या सेवा क्षेत्राची वाटचाल मंदावली असून, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक कार्यक्रियेचा वृद्धीदर मे महिन्यात एक वर्षाच्या नीचांक पातळीवर आला आहे. सेवा क्षेत्रातील ही घसरण तात्पुरती असू शकते, असेही बुधवारी जारी करण्यात आलेल्या मासिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. गुरुवारी भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा घेणार असताना सेवा क्षेत्राची कामगिरी स्पष्ट करणारा हा निर्देशांक जारी झाला आहे.
निक्की इंडिया सर्व्हिसेज बिझनेस अॅक्टिव्हिटी (पीएमआय) निर्देशांकात घट होऊन मे महिन्यात ५०.२० वर आला. हा वृद्धीदर मागील वर्षाच्या तुलनेत सर्वात कमी आहे. एप्रिल महिन्यात हा दर ५१ वर होत. व्यावसायिक कार्याची वृद्धी चाल सुस्तावली असली तरी सलग बारा महिन्यांत सेवा क्षेत्राचा विस्तार झाला आहे. भारतीय सेवा व्यवसाय घडामोडी (पीएमआय- पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) निर्देशांक ५० च्या वर असणे विस्ताराचे संकेत आहेत. त्याखाली निर्देशांक असणे, हे संकुचनाचा सांकेताक आहे.
आयएचएस मार्केटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आणि अहवाल लेखिका पॉलिएना डी लीमा यांनी सांगितले की, भारताचे प्रमुख सेवा क्षेत्र लोकसभा निवडणुकीमुळे सुस्तावले आहे. सलग तीन महिने नवीन कार्य आणि व्यावसायिक घडमोडी मंदावल्या आहेत.
ही सुस्ती तात्पुरती असू शकते. कारण कंपन्यांनी नोकरभरती वाढविली असून, ही बाब भविष्याच्या दृष्टिकोनातून अधिक विश्वासक आहे. सोमवारी जारी झालेला उत्पादन निर्देशांक पाहता एकूण खाजगी क्षेत्राची स्थिती चांगली असल्याचे दिसते. नवीन सरकार स्थापन झाले असून, धोरणात्मक कामही सुरू करण्यात आले आहे. तेव्हा २०१९ च्या उत्तरार्धात सुधारण होण्याची शक्यता आहे.