Join us  

सातव्या वेतन आयोगाची वाढ तूर्त बेसिक पुरतीच

By admin | Published: July 15, 2016 2:56 AM

सातव्या वेतन आयोगाने दिलेल्या घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता यांसारख्या भत्त्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगाने दिलेल्या घर भाडे भत्ता, प्रवास भत्ता यांसारख्या भत्त्यांची फेरतपासणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे तूर्त हे भत्ते जुन्या दरानेच मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ फक्त मूळ वेतनापुरताच (बेसिक पे) मर्यादित राहणार आहे.कर्मचारी संघनांच्या विरोधानंतरही केंद्रीय अर्थमंत्रालयाने भत्त्यांच्या आढाव्यासाठी समिती नेमली आहे. समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी चार महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत सर्व भत्ते जुन्याच दराने मिळतील. सर्व कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सातव्या वेतन आयोगानुसार मिळेल. तथापि, त्यावर महागाई भत्ता मिळणार नाही. सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना १२५ टक्के महागाई भत्ता मिळत होता. हा भत्ता आता मूळ वेतनात समाविष्ट करण्यात आल्याने नव्या पगारात तो वेगळा मिळणार नाही. सर्व मूळ वेतनावर २.५७ टक्के फिटमेंट फॅक्टरची रक्कम मिळेल. सध्याचा महागाई भत्ता मूळ वेतनात मिळविल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात १ जानेवारी २0१६ पासून किमान १४.२९ टक्के वाढ होईल. वार्षिक वेतनवाढीचा दर मात्र ३ टक्केच राहील. (लोकमत न्यूज नेटवर्क)