नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनचा (जीएसपीसी) एक मोठा गॅस प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. कृष्णा गोदावरी खोर्यातील गॅस उत्पादनासाठी कंपनी सज्ज झाली आहे. जीएसपीसीचा हा २ अब्ज डॉलरचा दीनदयाल शॅलो-वॉटर गॅस प्रकल्प असून, गॅस उत्पादनाबाबतच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. या प्रकल्पातून येत्या जून महिन्यात गॅसचे उत्पादन सुरू होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. गुजरात सरकारच्या या कंपनीला गॅस प्रकल्पासाठी यापूर्वी अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. कंपनीकडून चाचण्या सुरू असल्या, तरी नेमका प्रकल्प कधी कार्यान्वित होईल, त्या तारखेबाबत काहीही स्पष्टपणे सांगितले जात नाही. मात्र जून महिन्यात गॅस उत्पादन सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तोपर्यंत गॅसच्या किमतीबाबतचा वाद संपलेला असेल, असेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. कंपनीने गेल्या वर्षी जी गॅसची किंमत निश्चित केली त्याला केंद्र सरकारने मान्यता दिली नव्हती. सी. रंगराजन यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार किंमत निश्चित करण्याबाबत केंद्र सरकारने सुचविले होते. निवडणुकांमुळे याबाबत अंतिम निर्णय होऊ शकला नव्हता. सन २00५ मध्ये कंपनीला केजी ८ खोर्यात गॅस सापडला होता. त्या वेळी गॅसचा सर्वात मोठा साठा शोधण्यात यश आल्याचे सांगत, ज्या भागात गॅस सापडला त्या भागाचे मोदी यांनी दीनदयाळ असे नामकरण केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मोदींनी सूत्रे घेताच सुरु होणार जीएसपीसी प्रकल्प
By admin | Published: May 19, 2014 3:53 AM