Join us

‘दिवाळी’साठी ठरला जीएसटीचा १ जुलै मुहूर्त

By admin | Published: May 15, 2017 12:30 AM

वस्तू व सेवा कर (जीएसटी) १ जुलैपासून लागू करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. जीएसटी सप्टेंबरपासून लागू करण्यात यावा, असा एक मतप्रवाह आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : वस्तू व सेवा कर (जीएसटी) १ जुलैपासून लागू करण्यासाठी सरकार सज्ज झाले आहे. जीएसटी सप्टेंबरपासून लागू करण्यात यावा, असा एक मतप्रवाह आहे. पण, दिवाळी, नवरात्राच्या काळात व्यापाऱ्यांवर या निर्णयाचा प्रभाव पडू नये यासाठी जुलैचाच मुहूर्त योग्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. जुलैपासून वस्तू व सेवा कर लागू करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. काही कर सल्लागार, उद्योग संस्था, काही राज्ये यांनी असा सल्ला दिला आहे की, जीएसटी सप्टेंबरपासून लागू करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीएसटीची अंमलबजावणी पुढे ढकलण्याबाबत एक छोटा समूह आग्रही आहे. अधिकाधिक उद्योजकांनी जुलैपासून अंमलबजावणीसाठी तयारी केली आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातमधील विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होत आहेत. तत्पूर्वी जीएसटीची अंमलबजावणी राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची आहे. दिवाळीच्या काळात कपडे ते सोने आणि आॅटोमोबाइल्स क्षेत्रात मागणी वाढते. सप्टेंबरमध्ये जीएसटी लागू केल्यास सणासुदीच्या दिवसात फटाका उद्योगावरही परिणाम होऊ शकतो. जीएसटी लागू होण्याच्या संक्रमणकाळात काही अडचणी येऊ नयेत यासाठी उद्योगवर्तुळ पूर्वतयारी करत आहे. उद्योगवर्तुळात कार्यरत असणाऱ्या एका सल्लागाराने सांगितले की, बहुतांश कंपन्यांनी जुलैपासून जीएसटी अंमलबजावणी होईल, असे गृहीत धरून तयारी चालविली आहे. सरकारने एप्रिलपासूनच जीएसटी लागू करण्याची तयारी सुरू केली होती. पण, कराच्या मुद्द्यावर राज्य सरकारांशी बोलणी सुरू होती, त्यामुळे अखेर जुलैचा मुहूर्त काढण्यात आला.