Join us

GST : दिवाळीत सामान्यांना मिळणार मोठी भेट? विमा, सायकलसह 'या' गोष्टी स्वस्त होणार; काय महागणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 1:57 PM

GST : केंद्र सरकार सर्वसामान्यांना मोठी दिवाळी भेट देण्याची शक्यता आहे. अनेक गोष्टींवरील जीएसटी दर कमी करण्याची शिफारस मंत्री गटाने केली आहे.

GST : केंद्र सरकार दिवाळीत सामान्य लोकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी मंत्री गटाची समिती स्थापन करण्यात आली होती. यामध्ये अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. तर काही गोष्टींवरील दर वाढवण्याचेही सांगितले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या नेतृत्वाखाली या समितीने दिलेल्या निर्णयामुळे सामान्य लोकांना दिलासा मिळण्यासोबत २२,००० हजार कोटी रुपयांचा महसूल गोळा होऊ शकतो. या सुणासुदीला तुम्ही काही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमचे पैसे वाचवू शकते.

GST दर तर्कसंगत मंत्री गटाने शनिवारी २० लिटर पाण्याच्या बाटल्या, सायकली आणि सराव नोटबुकवरील कर दर पाच टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, या गटाने महागडी घड्याळे आणि शूजवर कर वाढवण्याची सूचना केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. GoM ने 20 लिटर आणि त्याहून अधिक क्षमतेच्या पाण्याच्या बाटल्यांवरील GST १८ टक्क्यांवरून कमी करून ५ टक्के करण्याची सूचना केली आहे.

महागड्या शूज आणि घड्याळांवर जीएसटी वाढणारयाशिवाय सराव नोटबुकवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याची शिफारसही करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सायकलीवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्याची सूचना आहे. या शिफारशींवर अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल घेईल. तसेच १५,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे शूज आणि २५,००० रुपयांच्या वरच्या घड्याळांवर जीएसटी १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची सूचनाही मंत्रीगटाने केली आहे.

विमा प्रीमियम स्वस्त होणारज्येष्ठ नागरिकांना आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रीमियमला ​​करातून सूट मिळू शकते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या कव्हरेजसाठी आरोग्य विम्यासाठी भरलेल्या प्रीमियमवर जीएसटी सूट देण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात अंतिम निर्णय जीएसटी कौन्सिल घेईल.

टॅग्स :जीएसटीकरमुख्य जीएसटी कार्यालय