India GST Collection: 2022-23 आर्थिक वर्ष आज संपत असून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारी तिजोरी भरली गेली आहे. या आर्थिक वर्षात सर्वाधीक GST कलेक्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षातील GST कलेक्शन विक्रमी 18 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे.
एवढा महसूल 12 महिन्यांत आला1 जुलै 2017 रोजी GST कायदा संपूर्ण भारतात एकाच वेळी लागू करण्यात आला. 18 लाख कोटी रुपयांचा आकडा या सहा वर्षांतील सर्वाधिक आहे. वित्त मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, FY2023 च्या पहिल्या 11 महिन्यांत GST संकलनाने ₹16.46 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे, जो वर्षभरात 22.7% ची मजबूत वाढ दर्शवितो. मार्च महिन्याची आकडेवारी आलेली नाही, परंतू सरासरी काढल्यास 18 लाख कोटींच्या आसपास कलेक्शन होईल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीएसटी अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये किमान 1.50 लाख कोटी संकलन होण्याची अपेक्षा आहे.
आतापर्यंतचे जीएसटी संकलन
- 2017-18 मध्ये 7.2 लाख कोटी रुपये
- 2018-19 मध्ये 11.8 लाख कोटी रुपये
- 2019-20 मध्ये 12.2 लाख कोटी रुपये
- 2020-21 मध्ये 11.4 लाख कोटी रुपये
- 2021-22 मध्ये 14.8 लाख कोटी रुपये
- 2022-23 मध्ये 18 लाख कोटी रुपये