Join us

GST संकलनात १८ टक्क्यांनी झाली वाढ; उपकर प्रथमच गेला १० हजार कोटी रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 8:44 AM

देशातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये जीएसटी संकलन १८ टक्क्यांनी वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : ओमायक्रॉनची बाधा कमी होत असून, देशातील दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच फेब्रुवारी महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन १८ टक्क्यांनी वाढले आहे. या महिन्यामध्ये १.३३ लाख कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले आहे. सलग पाचव्या महिन्यामध्ये जीएसटीचे संकलन १.३० लाख कोटी रुपयांहून अधिक राहिले आहे, हे विशेष होय. या महिन्यात प्रथमच उपकराचे संकलन हे दहा हजार कोटी रुपयांहून अधिक झाले आहे. 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मंगळवारी फेब्रुवारी महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार या महिन्यामध्ये एकूण १,३३,०२६ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यापैकी केंद्रीय जीएसटी २४,४३५ कोटी रुपये, तर राज्यांचा जीएसटी ३०,७७९ कोटी रुपये जमा झाला आहे. 

याशिवाय ६७,४७१ कोटी रुपयांचा एकात्मिक जीएसटीही जमा झाला आहे. यामध्ये ३३,८३७ कोटी रुपये हे वस्तूंच्या आयातीमधून जमा झालेले आहेत. या महिन्यामध्ये उपकरामार्फत १०,३४० कोटी रुपये जमा झाले आहेत. जानेवारीपेक्षा फेब्रुवारीमध्ये १८ टक्के अधिक कर संकलन झाले आहे. मागील फेब्रुवारी महिन्याशी तुलना करता यामध्ये २६ टक्क्यांची वाढ झाली.

जानेवारीमध्ये सर्वोच्च संकलन

- चालू आर्थिक वर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये जीएसटीचे आतापर्यंतचे सर्वोच्च संकलन झाले आहे. या महिन्यामध्ये १,४०,९८६ कोटी रुपयांचे संकलन झाले आहे. 

- ओमायक्रॉनचा धोका कमी होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये वाढ होत असल्याचा परिणाम होऊन जीएसटीचे संकलन वाढत असल्याचे दिसून आले आहे. फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा असल्यामुळे या महिन्यामध्ये जीएसटीचे संकलन कमी होत असते. मात्र यावर्षी त्यामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे, हे विशेष होय.

असे झाले संकलन

एप्रिल २०२१   १.३९ लाख कोटी, मे २०२१   ९७,८२१ कोटी, जून २०२१  ९२,८०० कोटी, जुलै २०२१  १.१६ लाख कोटी, ऑगस्ट २०२१  १.१२ लाख कोटी, सप्टेंबर २०२१ १.१७ लाख कोटी, ऑक्टोबर, २०२१   १.३० लाख कोटी, नोव्हेंबर २०२१  १.३१ लाख कोटी, डिसेंबर  २०२१  १.२९ लाख कोटी, जानेवारी २०२२  १.४० लाख कोटी.

टॅग्स :जीएसटी