Join us

जीएसटी संकलन पोहोचले तब्बल १.३१ लाख कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 9:53 AM

GST collection: नोव्हेंबरमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन २५ टक्क्यांनी वाढून १.३१ लाख कोटी रुपये झाले. जीएसटी लागू झाल्यापासूनचे हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे संकलन ठरले आहे. 

 नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) संकलन २५ टक्क्यांनी वाढून १.३१ लाख कोटी रुपये झाले. जीएसटी लागू झाल्यापासूनचे हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे संकलन ठरले आहे. वित्तमंत्रालयाने निवेदन जारी करून ही माहिती दिली. सलग पाचव्या महिन्यात करसंकलन १ लाख कोटी रुपयांच्या वर राहिले आहे, हे विशेष. निवेदनात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२१ मध्ये सकल जीएसटी महसूल १,३१,५२६ कोटी रुपये  राहिला. त्यात सीजीएसटी २३,९७८ कोटी, एसजीएसटी ३१,१२७ कोटी, आयजीएसटी ६६,८१५ कोटी (आयातीवरील ३२,१६५ कोटींसह) आणि अधिभार ९,६०६ कोटी रुपये (आयातीवरील ६५३ कोटींसह)  राहिला. सीजीएसटी हा केंद्रीय जीएसटी असून, एसजीएसटी हा राज्य जीएसटी, तर आयजीएसटी हा एकात्मिक (इंटिग्रेटेड) जीएसटी  आहे. शिथिल झालेला कोविड-१९ साथीचा विळखा आणि सरकारने केलेले धोरणात्मक व प्रशासकीय उपाय यामुळे नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलनात वाढ झाली आहे. सिस्टिम क्षमतेतील वाढ, विवरणपत्र न भरणाऱ्यांवरील कारवाई, विवरणपत्रांचे ऑटो-पॉप्युलेशन,  ई-वे बिलांचे ब्लॉकिंग आणि विवरणपत्र न भरणाऱ्यांनाही इनपूट टॅक्स क्रेडिटची अदायगी आदी उपायांचा त्यात समावेश आहे. 

२०१९ च्या तुलनेत अधिक संकलननोव्हेंबर २०२१ मधील जीएसटी संकलन नोव्हेंबर २०२० मधील जीएसटीच्या (१.०५ लाख कोटी) तुलनेत २५ टक्के अधिक आहे. तसेच नोव्हेंबर २०१९ च्या तुलनेत तो २७ टक्के अधिक आहे. जीएसटी सुरू झाल्यापासूनचे हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक संकलन ठरले आहे. पहिल्या क्रमांकावर एप्रिल २०२१ मधील १,३९,७०८ कोटी रुपयांचे संकलन आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये कर संकलन १,३०,१२७ कोटी रुपये होते.

टॅग्स :जीएसटी