Join us

ऑक्टोबरच्या पहिल्या तारखेला आली गुड न्यूज; GST ने भरली सरकारी तिजोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2023 8:57 PM

GST Collection Rise In September : अर्थ मंत्रालयाने जीएसटी संकलनाची आकडेवारी रविवारी जाहीर केली.

GST Collection: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारसाठी आनंदाची बातमी आली आहे. अर्थ मंत्रालयाने सप्टेंबर 2023 च्या जीएसटी संकलनाची आकडेवारी रविवारी जाहीर केली. यानुसार, देशातील एकूण वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी संकलन वार्षिक आधारावर 10 टक्क्यांनी वाढून 1.62 लाख कोटी रुपये झाले आहे.

सलग चौथ्या महिन्यात 1.6 लाख कोटी रुपये पार चालू आर्थिक वर्षात जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरी सातत्याने भरली जात आहे. या वर्षातील हा चौथा महिना आहे, ज्यात जीएसटी संकलन 1.6 लाख कोटी रुपयांच्या वर(1,62,712 कोटी रुपये) नोंदवले गेले आहे. यात केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) रुपये 29,818 कोटी, राज्य जीएसटी (एसजीएसटी) रुपये 37,657 कोटी आहे. याशिवाय इंटिग्रेटेड जीएसटी (आयजीएसटी) 83,623 कोटी रुपये (माल आयातीवर जमा केलेल्या 41,145 कोटी रुपयांसह) आणि सेस 11,613 कोटी रुपये (माल आयातीवर जमा केलेल्या 881 कोटी रुपयांसह) आहे.

जीएसटी संकलनाबाबत वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, सप्टेंबर 2023 मधील संकलन मागील वर्षीच्या याच कालावधीतील 1.47 लाख कोटी रुपयांपेक्षा 10 टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत एकूण GST संकलन 9,92,508 कोटी रुपये होते, जे एका वर्षापूर्वी नोंदवलेल्या 8,93,334 कोटी रुपयांच्या तुलनेत 11 टक्क्यांनी जास्त आहे.

ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीगेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट 2023 मध्ये, सरकारला 1,59,069 कोटी रुपयांचे एकूण GST संकलन प्राप्त झाले होते. यामध्ये CGST रु. 28,328 कोटी, SGST रु. 35,794 कोटी, IGST रु. 83,251 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या रु. 43,550 कोटींसह) आणि सेस रु. 11,695 कोटी (आयातीवर गोळा केलेल्या रु. 1,016 कोटींसह) होता. 

एप्रिलमध्ये सर्वाधिक संकलन देशात जीएसटी लागू झाल्यानंतर एप्रिल 2023 मध्ये सर्वाधिक जीएसटी संकलन झाले. हा आकडा 1.87 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. 2021-22 या आर्थिक वर्षात सरासरी मासिक जीएसटी संकलन 1.10 लाख कोटी रुपये होते, तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सरासरी संकलन 1.51 लाख कोटी रुपये होते आणि 2023-24 च्या पहिल्या तिमाहीत सरासरी संकलन रु. 1.69 लाख कोटी आहे.

टॅग्स :जीएसटीइन्कम टॅक्सव्यवसायगुंतवणूकपैसाकेंद्र सरकार