नवी दिल्ली : गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा एक लाख कोटी रुपयांचा घरात वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात जीएसटीतून मिळालेला महसूल एक लाख कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. जीएसटीच्या दरात कपात, कर चोरीला लगाम, योग्य उपाययोजना आणि संपूर्ण देशात एकच कर असल्यामुळे केंद्र सरकारला चांगला महसूल मिळाला आहे, असे अरुण जेटली यांनी सांगितले. तसेच, दर महिन्याला चालू वर्षात एक लाख कोटी रुपये जीएसटी जमा करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष असल्याचेही अरुण जेटली म्हणाले.
दरम्यान, जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर पहिल्यांदा एप्रिल महिन्यात रेकॉर्ड ब्रेक महसूल केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाला होता. एप्रिल महिन्यात एक लाख तीन हजार 458 कोटी जीएसटी जमा झाला होता. गेल्या सप्टेंबर महिन्यात 94,442 कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता. तर, मे महिन्यात 94,016 कोटी रुपये, जून महिन्यात 95,610 कोटी रुपये, जुलै महिन्यात 96,483 कोटी रुपये आणि ऑगस्ट महिन्यात 93,960 कोटी रुपये जीएसटी जमा झाला होता.