GST Council : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखालील GST कौन्सिलच्या (GST Council) सोमवारी(दि.9) झालेल्या बैठकीत धार्मिक तीर्थयात्रा करणाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत धार्मिक यात्रा करणाऱ्यांना आता हेलिकॉप्टर सेवेचा लाभ घेण्यासाठी 18 टक्क्यांऐवजी फक्त 5 टक्के जीएसटी भरावा लागेल. उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रेमचंद अग्रवाल यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे.
उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यात धार्मिक पर्यटन वाढेल
उत्तराखंड सरकारच्या वतीने ही मागणी करण्यात आली होती. जीएसटी परिषदेने आज याला मंजुरी दिली आहे. याचा फायदा उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांना होणार आहे. शिवाय धार्मिक पर्यटनही वाढेल. केदारनाथ आणि बद्रीनाथसारख्या दुर्गम भागात जाण्यासाठी वृद्धांना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या सोयीसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्यावर 18 टक्के जीएसटी लावला जात होता. मात्र, आता केवळ 5 टक्के जीएसटीमुळे लोकांना हेलिकॉप्टरने प्रवास करण्यासाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. यामध्ये शेअरिंग हेलिकॉप्टर सेवा घेतल्यावर तुम्हाला 5% टॅक्स भरावा लागेल, तर चार्टर्ड सर्विस घेतल्यावर 18% GST भरावा लागेल.
हा मुद्दा फिटमेंट समितीकडे पाठवला
शैक्षणिक संस्थांना संशोधनासाठी मिळणाऱ्या अनुदानावरील जीएसटीचा मुद्दा सध्या फिटमेंट समितीकडे पाठवण्यात आला आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर जीएसटी परिषद याबाबत निर्णय घेईल. याशिवाय ऑनलाइन पेमेंटवरील जीएसटीचे प्रकरणही फिटमेंट कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून हा मुद्दा चर्चेत आहे. जीएसटी कौन्सिलच्या 54 व्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती नंतर दिली जाईल. जीएसटी परिषदेची शेवटची बैठक 22 जून 2024 रोजी झाली होती. या समितीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांशिवाय सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश आहे.