नवी दिल्ली : जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, आजच्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कोणत्याही वस्तूवर कर वाढवण्यात आलेला नाही. तसेच, या बैठकीत पान मसाला आणि गुटखा उत्पादनांवरील कर वाढवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीत वेळेच्या कमतरतेमुळे तंबाखू आणि गुटख्यावरील करावर चर्चा होऊ शकली नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. तर जीएसटी कौन्सिलमध्ये डाळींच्या सालींवरील कराचा दर 5 टक्क्यांवरून शून्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी सांगितले.
जीएसटी कौन्सिलने शनिवारी काही अनुपालन करण्यात आलेल्या त्रुटींना गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढण्यावर सहमती दर्शवत अभियोजना सुरू करण्याची मर्यादा दुप्पट करून 2 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी 48 वी जीएसटी कौन्सिलची बैठक संपल्यानंतर घेतलेल्या या निर्णयांची माहिती दिली.
वेळेच्या कमतरतेमुळे जीएसटी कौन्सिलमध्ये 15 मुद्द्यांपैकी फक्त आठ मुद्द्यांवर निर्णय घेण्यात आला. जीएसटीवर अपीलीय न्यायाधिकरण बनवण्याशिवाय पान मसाला आणि गुटखा व्यवसायातील करचोरी रोखण्यासाठी यंत्रणा बनवण्याबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी म्हणाले की, ऑनलाइन गेमिंग आणि कॅसिनोवर जीएसटी आकारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली नाही. कारण, मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) काही दिवसांपूर्वी या मुद्द्यांवर आपला रिपोर्ट सादर केला होता. वेळ इतका कमी होता की जीएसटी कौन्सिलच्या सदस्यांनाही जीओएमचा अहवाल देता आला नाही.